प्रतिनिधी, राहुल कांबळे
उरणमधील यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याच्या 30 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून मुसक्या आवळल्या. गेल्या पाच दिवसांपासून नवी मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दाऊदच्या (Dawood Sheikh) मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा शोध घेण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं. या प्रकरणात ज्या पद्धतीने यशश्रीची हत्या करण्यात आली, त्यानंतर राज्यभरातून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज दाऊद शेखला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यशश्री हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याच्याविरोधात यशश्रीच्या कुटुंबीयांनी 2019 मध्ये छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी यशश्री अल्पवयीन असल्याने POCSO अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी दाऊदला शिक्षा झाली होती. त्याने लिखितस्वरुपात पुन्हा यशश्रीच्या संपर्कात जाणार नाही, तिला त्रास देणार नसल्याची कबुली दिली होती. ती केस अद्यापही सुरू आहे. मात्र त्याने यशश्रीची संपर्क केला, त्यामुळे 2019 मधील POCSO च्या या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुन्हा त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय आरोपी दाऊद शेख याच्याविरोधात अॅट्रॉसिटीचं कलम लावण्यात येणार आहे. त्यामुळे आरोपीविरोधात हत्या, अॅट्रॉसिटी आणि POCSO च्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
नक्की वाचा - यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडाला वेगळं वळण
ट्रान्झिट रिमांडला विलंब झाल्याने आरोपीला उरण पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. आज आरोपीला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. महाराष्ट्रभरातून या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकल हाताळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world