जाहिरात
This Article is From Apr 04, 2024

गडचिरोलीची लढत कोणासाठी डोकेदुखी?

गडचिरोलीची लढत कोणासाठी डोकेदुखी?
गडचिरोली:

गडचिरोली लोकसभा मतदार संघात भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र दोन्ही नेत्यांना पक्षांतर्गत नाराजीची जास्त चिंता आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका या दोघां पैकी कोणाला बसणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे. या वरच या दोन्ही नेत्याचं भवितव्य अवलंबून आहे. अशोक नेते विजयाची हॅट्रीक साधणार की किरसान काँग्रेसचा झेंड फडकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


अशोक नेते हॅट्रीक साधणार? 

भाजपनं  गडचिरोली लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ आणि त्यानंतर २०१९ असे लागोपाठ दोन वेळा नेते यांनी या मतदार संघातून विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या नामदेव उचेंडी यांचा त्यांनी पराभव केला. पण २०१९ मध्ये उसेंडी यांनी नेतेंचे जवळपास दिड लाखाचं लिड कमी केलं होतं हे विशेष. २००९ साली गडचिरोली हा नवा लोकसभा मतदार संघ तयार झाला होता. त्या निवडणूकीत आमदार असलेल्या नेतेंना भाजपनं लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. पण काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी नेतेंना पराभव केला. भाजप युवा मोर्चा, तालुका अध्यक्ष, आमदार, खासदार असा अशोक नेते यांचा प्रवास राहीला आहे. नेते आता पुन्हा एकदा गडचिरोलीतून आपलं नशिब आजमावत आहे. त्यामुळे ते इथून हॅट्रीक साधणार का याबाबत उत्सुकता आहे.
 

कोण आहेत डॉ. नामदेव किरसान? 

काँग्रेसनं डॉ. नामदेव किरसान यांना गडचिरोलीच्या मैदानात उतरवलं आहे. किरसान यांच्या रूपानं काँग्रेसनं नवा चेहरा या मतदार संघात दिला आहे. किरसान यांनी या आधी जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक लढली आहे. त्यांनी मागिल दोन वेळेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना उमेदवारी मिळण्यास यश मिळालं आहे. दांडगा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. शिवाय उच्च शिक्षीत म्हणून त्यांची मतदार संघात ओळख आहे. पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांचं मतदार संघात काम सुरूच होतं 
मात्र किरसान हे  गोंदीया जिल्ह्यातील आहेत. ते मुळचे गडचिरोलीचे नाहीत. शिवाय ते हलबा आदिवासी जमातीचे आहेत. ही जमता गडचिरोलीत फार कमी आहेत. या बाबी किरसान यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. 

पक्षांतर्गत नाराजीचा फटका कोणाला? 

गडचिरोलीतून निवडणूक लढण्यास दोन्ही पक्षाकडून अनेक जण इच्छुक होते. ही जागा आपल्याला सुटेल असं अजित पवार गटाचे मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांना वाटत होतं. त्यांनी तयारीही सुरू केली होती. पण ही जागा भाजपकडे गेल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय भाजपचे गडचिरोलीचे आमदार देवराव होळी आणि अशोक नेते यांचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे नेतेंना त्याचाही फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. एकीकडे मित्रपक्षाचे मंत्री नाराज तर दुसरीकडे स्वताच्या पक्षाचेच आमदार नाराज, अशा कात्रीत नेते सापडले आहेत. अशीच काहीशी स्थिती काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांची आहे.उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेस नेते नामदेव उसेंडी यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी याच मतदार संघातून दोन वेळा  निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे डॉ. नितीन कोडवते यांनीही आपल्या पत्नीसह भाजपची वाट धरली आहे. कोडवते हे विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पक्षातले दोन बडे नेते बाहेर गेले आहेत. त्याचा फटका किरसान यांना किती बसतो हे पहावं लागणार आहे.       

                                       गडचिरोलीतील पक्षीय बलाबल 
आमगावकाँग्रेस 
आरमोरीभाजप 
गडचिरोली भाजप 
अहेरी  राष्ट्रवादी काँग्रेस 
ब्रम्हपूरीकाँग्रेस 
चिमूर  भाजप     


मतदार संघात कोण वरचढ? 

गडचिरोली लोकसभेत गडचिरोलीतील ३ विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. तर चंद्रपूरातील दोन आणि गोंदीयातील एक विधानसभा मतदार संघाचा समावेश  होतो.  गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सहसराम कोरोटे हे आमदार आहेत. तर ब्रम्हपुरीमधून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार आहेत. आरमोरीमधून भाजपचे कृष्णा गजभे, गडचिरोलीतून देवराव होळी आणि चिमूरमधून भाजपचेच बंटी भांगडिया आमदार आहेत. तर आहेरीतून राष्ट्रवादीचे धर्मारावबाबा आत्राम हे आमदार आहेत. त्यामुळे गडचिरोली लोकसभेत भाजपचे ३, काँग्रेसचे २ तर राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आमदार आहे. 

बाजी कोण मारणार? 

भाजपचे अशोक नेते विरूद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्यात ही थेट लढत होत आहे. किरसान हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार केला जात आहे.  तर गेल्या १० वर्षात अशोक नेते यांनी काय केलं याचा जाब काँग्रेसकडून विचारला जात आहे. तर नाराजांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. अशा स्थितीत गडचिरोलीची जनता कोणाला साथ देते हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com