- अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा करतायत युवा स्वाभिमानचा प्रचार
- नवनीत राणा यांनी मोरबाग प्रभागात भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याचं आवाहन केलं
- नवनीत राणा यांनी राजेश साहू यांच्यावर चमचेगिरी आणि पैसे देऊन उमेदवारी मिळवल्याचा गंभीर आरोप केला आहे
शुभम बायस्कर
नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. निमित्त आहे अमरावती महापालिका निवडणुकीचे. या निवडणुकीत नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. पण असं असलं तरी त्या प्रचार मात्र आपले पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा करत आहेत. त्यांनी चक्क भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या मोरबागमध्ये सभा घेतली. इथं त्यांनी चक्क भाजपच्या एका उमेदवारा पराभूत करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या भूमीकेचा खासदार अनिल बोंडे यांनी समाचार घेतला आहे. कुणी ही संभ्रमीत करू नका. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ कमळ लक्षात ठेवावे असा टोला त्यांना राणा यांना लगावला आहे. त्यामुळे अमरावती भाजपमध्ये सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते मात्र नक्कीच संभ्रमात पडले आहेत.
अमरावतीच्या मोरबाग प्रभागात नवनीत राणा प्रचाराला गेल्या होत्या. पण हा प्रचार भाजपसाठी नाही तर पती रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारासाठी होता. त्यांना या प्रभागात चार उमेदवार आहेत. पण मतदान करताना तिन कमळ एक पाना अशी घोषणा दिली. एक भाजप उमेदवाराला पराभूत करण्याचं आवाहन केलं. राजेश साहू ( पड्डा ) हे या प्रभागात भाजपा उमेदवार आहेत. त्यांच्यावर राणा यांचा राग आहे. लोकसभा निवडणुकीत यांच्यामुळेच आपला पराभव झाला असा राणांचा दावा आहे. तो राग त्या आता या निवडणुकीत काढत आहेत. या साहू यांच्या ऐवजी युवा स्वाभिमानच्या दीपक साहू सम्राट यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी जाहीर पणे केले.
विशेष म्हणजे त्यांनी नाव न घेता राजेश साहू हा चमचेगिरी करणार आहे असा आरोप केला. चमचेगिरी करून त्यांनी उमेदवारी मिळवली. पण ही चमचेगिरी जास्त काळ टिकत नाही. पैसे देवून त्याने उमेदवारी आणल्याचा गंभीर आरोप ही नवनीत राणा यांनी केला. अशा बेईमान माणसाला हरवा असं ही त्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या. एकदा चुक तुम्ही केली आहे. तिच चूक आता करू नका असं ही त्या म्हणाल्या. या बेईमान माणसाला सबक शिकवा. राणा हे आपल्याच पक्षाच्या उमेदवारा बद्दल हे सर्व बोलत होत्या हे विशेष. हा प्रभाग भाजपचा गड मानला जातो. या ठिकाणी जावूनच त्यांनी ही भूमीका मांडल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?
नवनीत राणा यांच्या या भूमीकेमुळे भाजपचे मतदार संभ्रमीत नक्कीच झाले आहेत. त्यामुळे खासदार अनिल बोंडे हे पुढे आले आहेत. त्यांनी जे काही झालं त्यामुळे भाजप कार्यकर्ता व्यतीथ झाला आहे असं म्हटलं आहे. पण असं असलं तरी कुणीही संभ्रमीत होवू नये असं बोंडे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमतीनेच उमेदवारी दिली गेली आहे. प्रदेशाध्यक्षांची ही त्याला सहमती होती. त्यामुळे हिंदूत्वासाठी अमरावतीच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केला. राणा ज्या ठिकाणी गेल्या होत्या तो हिंदूत्वाचा गड आहे. तिथे संभ्रमित करणं चुकीचं आहे. चारही उमेदवार हे भाजपचे आहेत. त्यामुळे कुणाचे न ऐकता चारही भाजप उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन ही त्यांनी या निमित्ताने करत राणा यांना खडे बोल सुनावले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world