बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेसाठी आज अजित पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांनी खुलेपणाने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शब्द जपून वापरत कार्यकर्त्यांना सज्जड दमही भरला.
ज्या विधानामुळे अजित पवारांना टोकाची टीका सहन करावी लागली होती, त्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. त्यावेळी मी सहज आपल्या भाषेत बोलायला सुरुवात केली. सहज बोलता बोलता माझ्या तोंडून ते निघून गेलं. धरणाच्या वक्तव्याने माझं वाटोळं झालं. त्यानंतर मात्र कानाला खडा लावला. कॅमेरा असो वा नसो मी मेंदूला सतत शब्द जपून वापरावं असं सांगत असतो.
माणूस चुकतो, जो काम करतो तो चुकतो. मी बोलतो म्हणून एकदा शब्द गेला. पण नेहमी असं झालेलं नाही. चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं की मुलीला हे तुम्ही ठरवायचं. सून ही घरातील लक्ष्मी असते. घरातील सासूदेखील काही दिवसांनीव घराची जबाबदारी सुनेवर सोपवते. त्याशिवाय कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नाही. मीदेखील सुरुवातील भाषण करताना घाबरत होतो. परंतू मी शिकलो, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - 'कुंकू लावायचा असेल तर एकाचाच लावा'; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
रोखठोक भाषेची कायम चर्चा...
अजित पवार रोखठोक नेते म्हणून ओळखले जातात. जे त्यांच्या मनात तेच ओठांवर अशी त्यांच्याविषयी ख्याती असली तरी त्यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली असून त्यांचे फटकेही त्यांना सहन करावे लागले आहेत. धरणाच्या वक्तव्यानंतर तर त्यांच्यावर खूप टीका झाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनात अजित पवारांनी पीएचडी करून काय दिवे लावणार? असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भर अधिवेशनात केलेल्या या वक्तव्यानंतर विद्यार्थ्यांसह विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world