जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
Ajit Pawar Speech Baramati : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. बारामतीमध्ये यंदा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यात लढत होत आहे. पवार घरण्यातील या लढतीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) या दोघांसाठीही ही निवडणूक जिंकणं प्रतिष्ठेचं आहे. बारामतीमधील लोणी भापकरमधील प्रचारसभेत अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. 7 तारखेनंतर ही लोकं घरी आले तर मिशी कापून देईन, असं थेट चॅलेंज अजित पवारांनी यावेळी दिलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
... तर मिशी कापून ठेवेन
10 वर्ष खासदार होते. त्यांनी काय काम केलं हे मला सांगावं मी म्हणेल ते ऐकेल. कामाच्या बाबतीत आपणच करू शकतो. काम करणार तर आपणच करणार. घड्याळ मत म्हणजे आपल्या शेतीच्या पाण्याला मत मग तुम्ही काय करायचं ते ठरवा, असं अजित पवारांनी या सभेत बोलताना सांगितलं.
अजित पवार इतक्यावरच थांबले नाहीत त्यांनी 7 तारखेनंतर एक जण जरी आला तर मी मिशी काढून देईल, असं चॅलेंज त्यांनी दिलं. 'ते आता नुसते येतात 7 तारीख होऊ दे एक जण जरी आला तरी मिशी काढून देईन. खोटं नाही सांगत. त्यांना काहीही पडलेलं नाही. ते म्हणतील आम्हाला आमचा धंदा आहे. आमच्या गाड्या विकायच्या आहेत. आमच्या शो रुमचं कोण पाहाणार. माझं कर्जत-जामखेडचं कोण बघणार? हे माझ्या घरातीलच आहेत. पण आता फार वळवळ-वळवळ, चुरचूर-चुरचूर पोपट कसा बोलतो. तुम्ही माझ्या समोर या... तुमच्या समोर मी बोलतो. बोलायला कोण ऐकंत ते बघू. उगीच आम्ही गप्प बसलोय. आपलेच दात आपलेच ओठ कुठं लोकांसमोर पंचनामा करायचा, असं अजित पवार यांनी कुणाचंही नाव न घेता सुनावलं.
( नक्की वाचा : बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार? )
10 वर्षात पाण्यासाठी काय निधी आणला? किती दिवस वडीलधारी लोकांचे नाव घेऊन निवडून येणार येणार? मी माझ्या चुलत्याचे नाव घेऊन एकदा निवडून आलो ना? आता कामे दाखवा ना आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडला नाही. काँग्रेसने मुस्लिम समाजाची मते घेतली पण त्यांना न्याय दिला नाही.
( नक्की वाचा : .... तर 20 वर्ष सरकार बदललं नसतं, ' Exclusive मुलाखतीमध्ये शरद पवारांचा दावा )
ठराविक लोकांना पाण्याचे वॉल मिळाले, असं मला कळालंय. हा भेदभाव मी करणार नाही. ज्यांनी मला मदत केली त्यांना पाणी देणार ज्यांनी केली नाही त्यांना पाण्याला हात लावायचा नाही असे मी म्हणणार नाही. या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. एकमेकांवर टीका करुन लोकं टाळ्या वाजवातात पण,त्यामधून पाण्याचा प्रश्न सुटत नाहीत. मतभेद बाजूला ठेवा असं आवाहनही पवार यांनी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world