- भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक तीस नगरसेवक निवडून आले आहेत.
- महापालिकेतील बहुमतासाठी ९० जागांमध्ये ४६ जागांचा आकडा गाठणे आवश्यक आहे
- काँग्रेसला राष्ट्रवादी, समाजवादी आणि कोणार्क विकास आघाडीचे नगरसेवक मिळाल्यास महापौरपदासाठी आवश्यक बहुमत मिळेल
भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला आहे. मात्र असं असलं तरी काँग्रेस बहुमता पासून दुर आहे. 90 जागांच्या या महापालिकेत 46 बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे काँग्रेसला ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी मित्रपक्षांची मदत लागणार आहे. काँग्रेसला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 12, समाजवादी पक्षाचे 6 आणि कोणार्क विकास आघाडीचे 4 नगरसेवक मिळाल्यास, महापौरपदाचा मार्ग मोकळा होणार आहे.
काँग्रेसकडून तारीक मोमीन आणि प्रशांत लाड यांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. तसेच यापूर्वी महापौरपद भूषवलेल्या कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील व प्रतिभा पाटील यांची नावेही आघाडीतील उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. असं असलं तरी काँग्रेससाठी हे गणित तेवढं सोपं राहीलेलं नाही. भाजपचे 22 नगरसेवक भिवंडी महापिकेत निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना ही सत्तेची चाहूल लागली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने ही प्रयत्न सुरू केले आहेत.
भिवंडी महापालिकेत भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 12 नगरसेवक आहेत. दोघांचे मिळून 34 नगरसेवक होतात. बहुमतासाठी त्यांना 11 जणांची गरज आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मदत लागेल. शिवाय समाजवादी पक्षाचे नगरसेवक ही भाजपच्या सोबत आले तर भाजपला ही इथं महापौर करणं शक्य होणार आहे. भाजपकडून नारायण चौधरी आणि संतोष शेट्टी यांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत. शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संपर्क साधून आवश्यक ‘मॅजिक आकडा' गाठण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने महापौरपदाची लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world