जाहिरात
This Article is From May 03, 2024

'तो' पॉर्नस्टार नाही तर... तो कलाकार आला समोर, चित्रा वाघांच्या अडचणी वाढणार?

'तो' पॉर्नस्टार नाही तर... तो कलाकार आला समोर, चित्रा वाघांच्या अडचणी वाढणार?
मुंबई:

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक प्रचारासाठी  महिला अत्याचाराच्या प्रश्नावर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीमध्ये एका पॉर्न स्टारनं काम केलंय, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. शिवाय त्याचा फोटोही भर पत्रकार परिषदेत दाखवला होता. या आरोपानंतर तो कलाकारच समोर आला आहे. त्यांने आपण नक्की कोण आहोत हे सांगताना वाघ यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चित्र वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय वाघ यांनी कोणतीही शहानिशा न करता येवढे मोठे विधान कसे केले याबाबतही जोरदार चर्चा रंगली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्या जाहीरातीमधील कलाकार नक्की कोण? 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “वॉर रुकवादी पापा” जाहिराती वरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठा आरोप केला होता. त्यातील कलाकार हा पॉर्नस्टार आहे असा दावा त्यांनी केला. या जाहीरातीत बापच पॉर्नस्टार असेल तर काय करणार असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर तो कलाकारच समोर आला आहे. प्याराली उर्फ राज नयानी असे त्यांचे नाव आहे. ते कोणतेही पॉर्नस्टार नाहीत तर ते एक चरीत्र अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मालिका, जाहीराती आणि वेब सिरीजमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम केले आहे. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेला फोटो हा आपल्या वेब सिरीज मधला आहे असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार? चित्रा वाघ यांचा खळबळजनक आरोप

'चित्रा वाघ माफी मागा नाही तर...' 

चित्रा वाघ यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि दुख: देणारे आहेत असे राज नयानी यांनी सांगितले. “मी एक चारित्र कलाकार आहे. एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपली भूमिका एका व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. 

त्या कलाकाराने वाघ यांना सुनावले 

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो. हे त्यांना माहीत असावे . आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीज च्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रूनुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन. 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला.  जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरेन्स मध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता. चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे.  केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे. असेही ते म्हणाले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com