- नवी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार घराघरात प्रचार करत असून मतदारांना आकर्षित विविध तंत्र वापरले जात आहेत
- नवी मुंबई नेरूळ प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीखाली जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे
- दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली लिंबू, मिरची, हळदकुंकु आणि काळी बावली ठेवण्यात आली
राहुल कांबळे
महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची सांगता झाली आहे. आता उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी घर टू घर प्रचार करत आहेत. काही करून विजय मिळवायचा यासाठी उमेदवार वाट्टेल ते करत आहेत. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी नवनव्या क्लुप्त्या केल्या जात आहेत. त्यातून ही काही होणार नाही असं वाटलं तर थेट जादूटोण्याचा आसरा घेतला जात आहे. तसा एक प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी खळबळ उडाली आहे. हीबाब अधिक गंभीर असून अंधश्रद्धेवरही आता भावी लोकप्रतिनिधी विश्वास ठेवू लागले आहेत अशी चर्चा शहरात सुरू आहे.
ही घटना नवी मुंबई महापालिकेत घडली आहे. इथं आता प्रचार थांबला असला तरी उमदेवार घरोघरी जावून मतदारांना संपर्क करत आहेत. नवी मुंबई नेरूळ प्रभाग 23 मध्ये मात्र वेगळाच हातखंडा वापरला जात आहे. इथं थेट जादूटोण्याचा सहारा घेतला जात आहे.या प्रभागातून निवडणूक लढत असलेल्या शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीखाली जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नेरूळच्या या संपूर्ण प्रभागातच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली हा जादूटोणा करण्यात आला आहे. त्यांच्या गाडीखाली लिंबू, मिरची, हळदकुंकु, काळी बावली ठेवली होती. या काळ्या बावलीवर उमेदवार असलेल्या घोडेकर यांचा फोटो लावला होता. त्यावर टाचण्या टोचल्या होत्या. शिवाय काही तरी जादूटोणा केल्याचा प्रकार केला होता.निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
नक्की वाचा - Raj Thackeray: मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा घणाघात, निवडणूक आयोगावर 2 गंभीर आरोप
घोडेकर हे बहुमताने निवडून येणार असल्याची खात्री विरोधकांना झाल्यानेच हे कारस्थान रचल्याचा आरोप आता घोडेकर यांचे समर्थक करत आहे. या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृत्याचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य चौकशी करावी अशी मागणी होत आहे. घटनेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या प्रकारामुळे विजय मिळवण्यासाठी उमेदवार कोणत्या थराला जावू शकतात याचीच चर्चा मतदारांमध्ये चांगलीच रंगली आहे. त्यामुळे अशा प्रकारांना उधळवून लावण्यासाठी आता मतदार काय करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world