Dagdu Sakpal News : मुंबईच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून ते उद्या (रविवार, 11 जानेवारी) अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ठाकरे बंधूंची मुंबईत पहिली संयुक्त सभा होत आहे, त्याच दिवशी ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू सकपाळ यांचा पक्षप्रवेश रविवारी सकाळी 10 वाजता मुक्तागिरी या निवासस्थानी पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. दगडू सकपाळ हे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुलीच्या उमेदवारीवरून नाराजी
दगडू सकपाळ यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मुलीला महापालिकेत उमेदवारी न मिळणे हे आहे. त्यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. या निर्णयामुळे सकपाळ कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. आपल्या निष्ठेचे फळ मिळाले नसल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती.
( नक्की वाचा : Raj Thackeray : तो प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा, NDTV मराठीच्या मुलाखतीत राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा VIDEO )
म्हातारा झालो म्हणून गरज संपली का?
दगडू सकपाळ यांनी त्यांची व्यथा मांडताना अत्यंत भावूक शब्दांत पक्षावर टीका केली होती. माझ्या मुलीला उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली नाही तरी किमान पक्षप्रमुखांनी मला त्याबाबत आश्वस्त करायला हवे होते, असे ते म्हणाले होते. आता मी म्हातारा झाल्यामुळे कदाचित माझी आणि माझ्या अनुभवाची पक्षाला गरज उरलेली नाही, अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावरूनच ते लवकरच पक्ष सोडतील असे स्पष्ट संकेत मिळाले होते.
एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट
तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दगडू सकपाळ यांच्या परळ येथील राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच सकपाळ यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित मानला जात होता. भविष्यात शिंदे यांच्याकडून ऑफर आली तर विचार करू, असे विधानही त्यांनी केले होते. अखेर रविवारी सकाळी या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
( नक्की वाचा : KDMC Election कल्याण डोंबिवलीतील 'या' प्रभागात बिग फाईट, आमदार ते माजी महापौरांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला )
ठाकरे बंधूंच्या सभेच्या दिवशीच धक्का
मुंबईत रविवारी ठाकरे बंधूंची पहिली मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी ठाकरे गटाने केली असतानाच, त्यांच्या एका जुन्या आणि निष्ठावान सहकाऱ्याने साथ सोडणे ही मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल शिवडी आणि आसपासच्या परिसरातील राजकारणावर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world