- राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे
- मुंबईत मराठी क्रांती मोर्चा आणि मनोज जरांगे पाटील यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता
- मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिल्याचा दावा नाकारल आहे
महापालिका निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारीला मतदान होत आहे. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी हे मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. तर पैसे वाटपा वरूनही अनेक ठिकाणी वातावरण तंग झालं होतं. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या जात आहेत. त्यात एक बातमी समोर आली होती. मराठी क्रांती मोर्चा आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत ठाकरें बंधूंना पाठिंबा जाहीर केल्याची पोस्ट व्हायरल होत होती. त्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ही भूमीका मांडली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांनी पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्याच बरोबर मनोज जरांगे यांच्या पाठिंब्याचं पत्रक ही सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. त्यामुळे मुंबईतले मराठा आंदोलक ही एक्टीव्ह झाले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही आपली भूमीका स्पष्ट केली आहे. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीत कुठल्याच पक्षाला आपण पाठिंबा दिला नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
कुणी तरी जुने व्हिडीओ काढून ते व्हायरल करत आहे असं जरांगे यांनी सांगितलं. माझा व्यक्तिगत कुणालाच पाठींबा नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी यांना किंवा कुठल्याच पक्षाला कुठे ही पाठींबा दिला नाही असं ही त्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजला किंवा मराठा आरक्षणाला विरोध करणारे जर कुठं उभे असतील तर त्यांना मराठा समाजाने मदत करू नये असं आवाहन मात्र त्यांनी यावेळी केलं आहे. जे पाठींब्याचे व्हिडीओ आणि पत्रक व्हायरल होत आहे त्याच्या आपला कसला ही संबंध नाही असं ही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. समाजाने कुणाला पाठींबा द्यायचा या त्यांचा वैयक्तीत प्रश्न आहे असं ही त्यांनी सांगितलं आहे.
जरांगे पाटील यांच्या या स्पष्टीकरणामुळे मराठा समाज कोणत्या बाजूने जाणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. जरी त्यांनी कुणालाही पाठींबा दिला नसला तरी मराठा आरक्षणाला विरोध करणारे, त्यात अडथळा आणणारे कुणी असतील तर त्यांच्या विरोधात मतदान करा असं आवाहन करायला ते विसरले नाहीत. त्यामुळे ही मते आता कुणाच्या बाजूने जाणार हे पाहावं लागणार आहे. जरांगे यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमीका घेतली आहे. अशा वेळी मराठा समाजाची मते मिळावीत यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशिल असणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world