- मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला
- हल्ल्यात जखमी झालेले उमेदवार हाजी कुरेशी यांना महात्मा गांधी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले
- अज्ञात हल्लेखोर प्रचार रॅली दरम्यान अचानक जवळ येऊन चाकूने हल्ला करून तिथून पसार झाला
महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिकेत ही ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपही ताकदीने प्रचारात उतरला आहे. सर्वच उमेदवार आता प्रचारात स्वत:ला झोकून देत आहेत. त्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर प्रचार करत असताना चाकूचा हल्ला झाला आहे. या चाकू हल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार जबर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रचार रॅली सुरू असतानाच अज्ञात इसमाने हा हल्ला केला.
वांद्रे इथल्या वार्ड क्रमांत 92 मधून शिवसेना शिंदे गटाने हाजी कुरेशी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दिल्यानंतर ते आपल्या वार्डात प्रचार करत आहेत. वांद्रे इथल्या ज्ञानेश्वर नगर इथं ते प्रचारासाठी आज आले होते. प्रचार रॅली सुरू असतानाच एक अज्ञात इसम त्यांच्या जवळ आला. त्यांना काही समजण्या आत त्याने त्यांच्या पोटात चाकू मारला. त्यात ते जखमी झाले. शिवाय हल्ला इतका जबर होता की ते खाली कोसळले. तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
वांद्र्याच्या ज्ञानेश्वरनगर इथं ही घटना घडली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाला. त्याला कुणाला पकडता ही आले नाही. कुणाला काही समजण्या आत तो तिथून निसटला होता. याबाबत पोलीसात तक्रार करण्यात आली असून हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत. निवडणुकी दरम्यान राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशाच घटना घडत आहेत. आधी अकोल्यात काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर ही चाकू हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर इथं ही माजी खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला होता.
एकीकडे आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात अशी हल्ल्यांच्या ही घटना घडत आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेत ही मानसी काळोखे विजयी झाल्यानंतर त्यांचे पती मंगेश काळोखे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. काळोखे हे देखील शिवसेना शिंदे गटाचेच कार्यकर्ते होते. राजकीय वादातून हा खून झाला होता. अशा घटनामुळे मतदारांमध्ये ही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीसांनाही अशा घटनांवर लवकर नियंत्रण आणावे लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world