
शुभम बायस्कार
भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापूर विधानसभा मतदार संघात वेगळा निर्णय घेतला आहे. त्यांनी रवी राणा यांच्या पक्षातर्फे दर्यापूर विधानसभेतून उभ्या असलेल्या रमेश बुंदिलेंचा प्रचार करणार आहेत. त्यांनी या मतदार संघात महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या आणखी एक नेत्याने अडसुळांना पाठिंबा न देता रमेश बुंदेल यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे दर्यापूर विधानसभेत महायुतीच्याच नेत्यांकडून अडसूळ पिता-पुत्राची कोंडी करण्यात आली आहे. यामुळे अडसुळांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीच्या दर्यापूर विधानसभेत तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे गजानन लवटे हे उमेदवार आहेत. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे कॅप्टन अभिजीत अडसूळ हे मैदानात आहेत. आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनी गेल्या लोकसभेत माजी खासदार नवनीत राणा यांचं काम केलं नाही असा राणा दाम्पत्याचा आरोप आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याचा अभिजीत अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यामुळे रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना दर्यापूर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा
बुंदिलेंना निवडून आणण्यासाठी नवनीत राणा व रवी राणा यांनी दर्यापूर मतदार संघ पालथा घालत आहे. त्यांनी सभांचा धडाका ही लावला होता. या सभांमधून नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्याविरुद्ध जोरदार टीका केली. तर अडसूळ पिता पुत्रावर बँक घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. राणा दांपत्याकडून महायुतीत बंडाचे निशाण फडकल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपच्या एका दिग्गज नेत्याकडून महायुतीत बंडखोरी करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - हा 'नोट जिहाद' आहे का? ठाकरेंचा शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल
दर्यापूर विधानसभेचे 25 वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या प्रकाश भारसाकळे यांनी आता थेट शिंदे गटाचे उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यांनी ही युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियवार व्हायरल होत आहे. भारसाकळे हे अकोटचे आमदार असून सध्या ते या ठिकाणाहून महायुतीतर्फे निवडणूक लढत आहेत. त्यांचं दर्यापूर विधानसभेत मोठे प्राबल्य आहे. दर्यापूर हा त्यांचा गड मानला जातो.
त्यांनी भाजपमध्ये जिल्हाप्रमुखपदासह अन्य महत्त्वाची पदे देखील भूषवले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अडसूळ पिता-पुत्रांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा, रवी राणा आणि आता थेट प्रकाश भारसाकळे यांनी कंबर कसल्यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत अडसूळ पिता पुत्रांनी राणां विरोधात भूमिका घेतली होती. समोर जरी आपण राणांचे काम करणार असल्याचे सांगितले होते तरी प्रत्यक्षात त्यांनी काम केले नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्याची परतफेड त्या आता विधानसभा निवडणुकीत करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world