दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला खिंडार पाडले. भाजप सत्ता स्थापन करणार आहे. तर आम आदमी पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. ही निवडणूक जरी भाजप आणि आम आदमी पार्टीच्या भोवती फिरत राहीली. असं असलं तरी निकालानंतर चर्चा होती ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या 23 उमेदवारांची. ही चर्चा होण्याचे कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती. विशेष म्हणजे या निकालानंतर अजित पवारांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रा बाहेर लढवली गेलेली ही पहिली निवडणूक होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत आपले 23 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यातील एकाही उमेदवाराला विजय सोडा साधं आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही. 23 पैकी 23 उमेदवारांचे डिपॉझिट गुल झाले. यातील काही उमेदवारांना 100 मतं ही मिळाली नाहीत. तर काहींना 50 मतांचा आकडाही गाठता आला नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपुर्ण दिल्लीतून केवळ 3 हजार 64 मतं मिळाली. मतांची टक्केवारी ही केवळ 0.03 टक्के होती. राष्ट्रवादीच्या उमेदवारां पेक्षा काही अपक्षा उमेदवारांनाही चांगली मतं मिळाली आहे. तर एनडीएतील घटक पक्ष असलेले जनता दल युनायटेड आणि जनशक्ती पासवान पक्षाचे एक एक उमेदवारे हे पराभूत जरी झाले असले तरी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. पण अशी कामगिरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला करता आली नाही. पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर अजित पवारांनाच बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचे स्पष्ट झाले.
दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल मी प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमित शहा जी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे.पी नड्डा जी यांचं मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 8, 2025
दिल्ली…
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीच्या बलीमारन मतदार संघातून एम डी हारून हे निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना सर्वात कमी म्हणजे अवघी 38 मतं मिळाली. तर रतन त्यागी या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे 1500 मतं मिळाली आहेत. बाकिच्या उमेदवारांची संपुर्ण निवडणुकीत वाताहत पाहायला मिळाली आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपचे या विजया बद्दल अभिनंदन केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Parvesh Varma : अरविंद केजरीवाल यांना पाडणारे 'जायंट किलर'; कोण आहेत परवेश वर्मा?
तर राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळालं आहे. अशी प्रतिक्रीया त्यांनी आपल्या पराभवा बद्दल दिली आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचं विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. त्या दृष्टीने पुढील काळात काम केलं जाईल असंही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world