![Parvesh Varma : अरविंद केजरीवाल यांना पाडणारे 'जायंट किलर'; कोण आहेत परवेश वर्मा? Parvesh Varma : अरविंद केजरीवाल यांना पाडणारे 'जायंट किलर'; कोण आहेत परवेश वर्मा?](https://c.ndtvimg.com/2025-02/0anidgho_parvesh-varma_625x300_08_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला खिंडार पडलं आहे. भाजपने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमबॅक केलं आहे. मतमोजणीच्या कलांनुसार भाजपने 47 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्षाने 23 जागांवर आघाडी घेतली आहे. 'आप'चे धुरंधर नेते भाजपच्या कामगिरीपुढे उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचाही पराभव झाला आहे.
भाजपचे परवेश वर्मा दिल्ली विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत. परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर आता परवेश वर्मा हेच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
(नक्की वाचा- Election Results 2025 LIVE Updates: "विकास आणि सुशासन जिंकलं", दिल्लीतील विजयावर PM नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया)
कोण आहेत परवेश वर्मा?
परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. परवेश यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये एमबीएची पदवी घेतली आहे.
परवेश वर्मा यांनी महरौली विधानसभा मतदातसंघातून निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते योगानंद शास्त्री यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून निवडणूक जिंकून लोकसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला होता. महाबल यांनी 5 लाख 78 हजार 486 मतांनी पराभव केला. जो दिल्लीतील सर्वात मोठ्या अंतराने झालेला पराभव होता. परवेश वर्मा संसदेच्या वित्त समितीचे सदस्यही राहिले आहेत. त्यांनी संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यांच्या संयुक्त समितीवरही काम केले आहे.
(नक्की वाचा- Delhi Election Results 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवालांसमोर आव्हान
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने परवेश वर्मा यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. जिथे त्यांची लढत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्याविरुद्ध होती. या जागेवर परवेश वर्मा यांनी शानदार विजय मिळवत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.
प्रवेश वर्मा यांची एकूण संपत्ती
निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रवेश वर्मा यांनी त्यांच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, परवेश वर्मा यांच्याकडे सध्या तीन गाड्या आहेत, ज्यामध्ये 36 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा, 9 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि 11.77 लाख रुपयांची महिंद्रा एक्सयूव्ही यांचा समावेश आहे. यासोबतच त्याच्याकडे 2 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. परवेश वर्मा यांनी त्यांची जंगम मालमत्ता 77 कोटी 89 लाख 34 हजार 554 रुपये असल्याचे घोषित केले आहे. तसेच त्यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता 12 कोटी 19 लाख रुपयांची आहे. प्रवेश वर्मा यांच्या मालमत्तेत शेतीची जमीन, गोदाम आणि घर यांचा समावेश आहे. अशी सर्व मिळून ते 90 कोटी रुपयांची मालक आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world