Uddhav Thackeray Speech : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पहिली संयुक्त सभा मुंबईत झाली. या सभेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंना मुंब्र्यामध्ये शिवमंदिर बांधण्याचं आव्हान दिलं होतं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी या भाषणात देवेंद्र फडणवीस यांना मुंब्र्यात जाण्याचा सल्ला दिला. यावेळी ठाकरे म्हणाले की, 'देवाभाऊ, मुंब्र्यामध्ये पहिल्यांदा जा, मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर जे शिल्प आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जिजाऊ आहेत. तुकाराम महाराज आहे. सावित्रीबाई फुले आहेत. हे पाहा. पण, मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येतो. ज्या जिल्ह्यातून तुम्ही आमचा गद्दार फोडला आणि डोक्यावरती बसवला होता त्याच्या जिल्ह्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणं अवघड वाटत असेल, तर गद्दाराला घेऊन नाचलात कशाला?' असा सवाल ठाकरे यांनी विचारला.
फडणवीस यांनी दिलं होतं आव्हान
यापूर्वी कोल्हापूरच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं, 'उद्धवजी तुम्ही म्हणता सगळीकडं शिवरायांचं मंदिर उभारणार, चला तर मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु, तुम्हाला मदत करायला आम्ही देखील तयार आहोत. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे यांच्या नेतृत्त्वात पहिलं मंदिर तिथं उभारु आणि शिवरायांना वंदन करु, असं फडणवीस म्हणाले होते.
( नक्की वाचा : 'चला मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु', देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज )
मविआच्या 5 गॅरंटी कोणत्या?
महाविकास आघाडीने या सभेमध्ये निवडणूक जाहीरनाम्यात 5 गॅरंटीची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीने दिलेल्या 5 गॅरंटी
• महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये, महिला व मुलींना मोफत बस प्रवास
• शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन
• जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील
• 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे
• बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत