विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न गाजताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औंरगाबादचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्याला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध आहे. पण यांनी किती ही जोर लावला तरी आम्ही नामांतर करणार असे शाह म्हणाले होते. त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुणतू सुजात आंबेडकरांनी आता नवी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे डॉ. आंबेडकरांच्या संविधानाबाबत भाजप किती आत्मीयता आहे हे सांगत आहे. असे असताना दुसरीकडे बाबासाहेबांच्याच पणतूने औरंगाबादच्या नामांतराबाबत केलेल्या मागणीचे भाजप काय करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
औरंगाबादच्या नामांतराच्या वादात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. त्यांना औरंगाबादचे नाव बदलण्याला विरोध केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य हे पुण्यातून होते. त्यामुळे आपल्याला जर संभाजी महाराजांचा आदर करून एखाद्या शहराला नाव द्यायचं असेल, तर ते नाव पुण्याला द्यायला पाहीजे. पुण्याचं नावं छत्रपती संभाजीनगर केलं पाहीजे. शिवाय औरंगाबादचं नाव औरंगाबाद राहू दिलं पाहीजे. असं सुजात आंबेडकरांनी सांगितलं. वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदार संघाचे वंचितचे उमेदवार प्रशांत गोळे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा विरोध आहे असे अमित शाह म्हणाले होते. शिवाय पवारांनी कितीही जोर लावला तरी आम्ही औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करणारच असे शाह यांनी ठासून सांगितले. मात्र आता सुजात आंबेडकर यांनी केलेल्या नव्या मागणीला भाजप काय उत्तर देणार हे पाहणे गरजेचे आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा नामांतराचा मुद्दा पुन्हा एकादा ऐरणीवर आला आहे. त्याल आता भाजप कशा पद्धतीने हाताळणार हे पहावं लागणार आहे.
दरम्यान सुजात आंबेडकर यांनी बटेंगे तो कटेंगे यावरही प्रतिक्रीया दिली आहे. या घोषणेला महायुतीतील अजित पवार यांनी विरोध केला आहे. अजित पवारांनी हे केवळ परतीचे दोर उघडे ठेवले आहेत. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केल्याचे सुजात यांनी सांगितले. सध्या वंचितच्या प्रचाराची धुरा सुजात आंबेडकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्बेत ठिक नसल्यामुळे सुजात आता मैदानात उतरले आहेत. त्यात त्यांनी नामांतराबाबत मांडलेल्या भूमिकेचे पडसाद प्रचारात नक्कीच उमटतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world