पिंपरी चिंचवड: 'शरद पवार हे फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक आहेत',असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरित होत असल्याची खोटी माहिती पसरवून विरोधक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अजूनही पहिली पसंती आहे आणि संपूर्ण भारतातील ५२% विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक दृष्टिकोनातून मजबूत आहे आणि विरोधकांनी पसरवलेली माहिती फसवी आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्या सरकारने महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी एक आदर्श ठिकाण बनवले आहे. त्यांच्या मते, राज्यातील औद्योगिक स्थान बदलत असल्याची बातमी खोटी असून ती फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचाही फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीच्या व्यवस्थापिका असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला. राज्यातील औद्योगिक आणि IT क्षेत्र सशक्त आहे आणि कोणतेही आव्हान हे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आलेल्या अडचणींचा परिणाम आहे. सुळे यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी याला महाराष्ट्राच्या प्रगतीस नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंवरही टीका..
"उद्धव ठाकरे यांच्या ‘लाडकी बहीण' योजनेवरील टीकेचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, ठाकरे यांची योजना विरोध दर्शवणे हे सर्वसामान्य लोकांच्या गरजांशी विसंगत आहे. फडणवीसांनी स्पष्ट केले की, या योजनेतून हजारो मुलींना आर्थिक मदत मिळणार असून त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध होतील.सभेच्या शेवटी फडणवीसांनी भाजप सरकारच्या रोजगार निर्मितीविषयी आश्वासन दिले. त्यांनी १० लाख युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आणि महाराष्ट्राच्या आर्थिक स्थैर्याचे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्याचे वचन दिले. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, विरोधकांनी पसरवलेल्या “फेक नॅरेटिव्ह” पासून सावध राहावे आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर विश्वास ठेवावा. या सभेमध्ये फडणवीसांनी भाजपची पारदर्शकता आणि विकासाभिमुखता स्पष्ट करत विरोधकांची “फेक नॅरेटिव्ह” धोरण म्हणून प्रतिमा निर्माण केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world