विधानसभा निवडणूक निकाल लागण्या आधी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातून आमदार राहीलेल्या दादाराव केचे यांनी आपण राजकीय सन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. सन्यासाची घोषणा करत असताना त्यांनी पक्षावर गंभिर आरोप केले आहेत. पक्षाने आपल्याला वेळेवर धोका दिला. माझा अपमान केला असा आरोपही त्यांनी या निमित्ताने केला आहे. आपल्यावर पक्षाच्याच लोकांनी केलेले आरोप जर आठ दिवस आधी केले असते तर यांना कधीच संपवलं असतं असा संताप ही त्यांनी व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आर्वी विधानसभा मतदार संघातून दादाराव केचे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण त्यांना शेवटच्या क्षणी डावलण्यात आलं. त्यांच्या ऐवजी सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या केचे यांनी शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं होतं. शिवाय त्यांची अमित शाह यांच्याबरोबरही भेट घालून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्जही मागे घेतला होता.
पक्षाचे उमेदवार सुमित वानखेडे यांचा प्रचारही त्यांनी केला. वानखेडे यांच्या प्रचारासाठी त्यांनी 27 सभा मतदार संघात घेतल्या असं त्यांनी सांगितलं. पण मतदान झाल्यानंतर केचे यांनी काम केलं नाही असा त्यांच्यावर आरोप झाला. त्यामुळे केचे हे दुखावले गेले. या मतदार संघात 1982 पासून आपण काम करत आहे. त्यावेळी पक्षाकडे कार्यकर्तेही नव्हते. गावागावत फिरून कार्यकर्ते निर्माण केले. संपुर्ण मतदार संघात आपल्याला मानणारे कार्यकर्ते आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मी सांगेन ते करण्यासाठी ते तयार आहे. त्यामुळे जर आपण अपक्ष निवडणूक लढलो तर आपलं काही खरं नाही हे वानखेडे यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी आपल्याशी संपर्क ही केला होता.
ट्रेंडिंग बातमी - बंडखोर अपक्ष उमेदवार समिर भुजबळांना महायुतीकडून संपर्क? भुजबळ म्हणाले...
पक्षहितासाठी आपण उमेदवारी मागे घेतली. वानखेडे निवडून यावेत यासाठी प्रचारही केली. ते शंभर टक्के निवडून येतील. असं असताना माझ्यावर आरोप करण्यात आले. त्यांनी माझ्यासाठीच खड्डा खणला. आधी पक्षाने वेळेवर उमेदवारी दिली नाही. धोका दिला. त्यानंतर अपमान केला. खोटे आरोप केले. हे जर आठ दिवस आधी केले असते तर यांना संपवलं असतं अशी संतप्त भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ट्रेंडिंग बातमी - बच्चू कडूंना कोणी केला संपर्क? पाठिंबा कोणाला ते ही केलं स्पष्ट
पक्षाने ज्या पद्धतीने आपल्याला धोका दिला त्यामुळे आपण दुखी आहोत. त्यामुळे आपण राजकीय सन्यासाची घोषणा करत आहोत असं ते म्हणाले. या पुढच्या काळात समाजाचं काम करणार असल्याचंही ते म्हणाले. निकालाच्या एक दिवस आधीच केचे यांनी राजकीय सन्यासाची घोषणा केल्यानं सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. केचे यांची नाराजी भाजप उमेदवार सुमित वानखेडे यांना भोवण्याची चर्चाही आता मतदार संघात होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world