2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचा आलेख निवडणुकांमध्ये सातत्याने घसरताना दिसतो आहे. काँग्रेसने मतांच्या लढाईत विजय मिळवण्यासाठी विविध प्रय्तन करून पाहिले मात्र ते सगळे आतापर्यंत निष्फळ ठरले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी वोटचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. वोटचोरीचा आरोप करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवरच टीकास्त्र सोडलं होतं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाती घेतलेला हा मुद्दा, त्यांनी केलेली निवडणूक आयोगावरील टीका ही समाजातील काही बुद्धीवंतांना अजिबात आवडलेली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठी नामुष्की सहन करावी लागली होती. या निकालांनंतर 272 नामवंत बुद्धीवंतांनी एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये या बुद्धीवंतांनी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासारख्या संस्थांना बदनाम करण्यासाठी केलेल्या आरोपांवरून नाराजी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा: 'महिलांसाठी 30 कोटींचे कर्ज द्या!' पिंपरी-चिंचवडच्या नेत्याची थेट जागतिक बँकेकडे मागणी
बुद्धीवंतांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटले आहे ?
देशभरातील 272 नामवंत बुद्धीवंतांनी राहुल गांधी यांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही सभ्य समाजातील ज्येष्ठ नागरीक आहोत. भारताच्या लोकशाहीवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे आम्ही चिंताग्रस्त झालो आहोत. भारतीय लोकशाहीच्या मजबूत स्तंभावर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. काही राजकीय मंडळी ही राजकीय पर्याय निर्माण करण्याऐवजी लोकांची माथी भडकावणारे आणि बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहेत आणि याद्वारे आपले राजकारण रेटण्याचा प्रयत्न करतायत.
नक्की वाचा: लातूरमध्ये देशमुख काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष चिघळला, अमित देशमुखांच्या आदेशानंतर पक्षात खळबळ
प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न
या पत्रामध्ये बुद्धीवंतांनी पुढे म्हटलंय की, आपला राजकीय उद्वेग दडविण्यासाठी निवडणूक आयोगासारख्या संस्थांवर आरोप केले जात आहे. भारतीय सैन्याच्या धाडस आणि विजयावर शंका उपस्थित करत त्यांची प्रतिमाही मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर, संसद आणि घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींबद्दल शंका उपस्थित करत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा परिस्थितीत आता निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की, पद्धतशीरपणे षडयंत्र रचणाऱ्यांचा मुकाबला करत आपली इमानदारी आणि प्रतिष्ठा जपावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world