महायुतीत आता मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपला महायुतीत सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा असा युक्तीवाद केला जात आहे. त्याला राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी पाठिंबाही दिला आहे. शिवाय केंद्रीय रामदास आठवले यांनीही भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहीजे असं म्हटलं आहे. तर निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावं असा युक्तीवाद शिंदेंची शिवसेना करत आहे. त्यामुळे पेच फसला आहे. यावर आता मुख्यमंत्री कोण हे आधी तुम्हीच ठरवानंतर दिल्लीत या अशा सुचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीत पेच अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिली. त्यानंतर त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. महायुतीला पूर्ण बहुमत असल्याने ते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. पण मुख्यमंत्री कोण हे ठरत नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करता आलेला नाही. यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तोडगा काढावा असे आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिले आहे.
फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार अशी चर्चा होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून हे नेते मुंबईत आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा या तिन्ही नेत्यांनी मुंबईत करावी. त्यावर एकमताने अंतिम निर्णय घ्यावा. नाव निश्चित करावे. त्यानंतर दिल्लीत यावे असे स्पष्ट निर्देश भाजपच्या श्रेष्ठींनी दिले आहेत. त्यानंतर दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिंदे,फडणवीस आणि पवारांची संयुक्त बैठक होणार आहे. त्यात निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
विधानसभा निवडणुका या महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. जे यश महायुतीला मिळाले आहे त्यात शिंदेंचा वाटा मोठा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहीजेत असा आग्रह शिंदेंच्या शिवसेनेचा आहे. तशी वक्तव्यही त्यांच्या नेत्यांनी केली आहे. स्वत:शिंदे यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशा वेळी ते सहजासहजी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडण्यास ते तयार नाहीत. अशा वेळी दिल्लीतील श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.