Pune BJP : विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पुणे भाजपासाठी दिलासा देणारा ठरला. वडगाव शेरी आणि कसबा या शहरातील दोन विधानसभा मतदारसंघात नाराज असलेल्या दोन बड्या भाजपा नेत्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आलं आहे. वडगाव शेरी मतदारसंघात माजी आमदार जगदीश मुळीक अर्ज भरण्यासाठी निघाले होते. त्यांनी शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्यानं माघार घेतली. त्यापाठोपाठ पुणे शहराचे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांनी 'झाले गेले विसरून जाऊ, नव्या दमाने महायुतीला निवडून देऊ..' म्हणत आपली बंडाची तलवार म्यान केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास धीरज घाटे इच्छूक होते. पण, भाजपानं कसबामधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे घाटे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. घाटे काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
घाटे यांनी मंगळवारी हेमंत रासने यांनी अर्ज भरताना उपस्थित राहत आपण पुन्हा एकदा पक्षाच्या कामात सक्रीय झाल्याचं जाहीर केलं. त्यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत पुण्यातील सर्व 8 उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं.
काय केलं ट्वि्ट?
झाले गेले विसरून जाऊ, नव्या दमाने महायुतीला निवडून देऊ…
टकाही निर्णयांवरून नाराज होणे, हा मानवी स्वभाव आहे. पण त्यातच अडकून न बसता, पुढे सरकणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. मी कायमच भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भविष्यातही राहणार. महायुतीचे पुण्यातील सर्व 8 उमेदवार निवडून देण्यासाठी मंगळवारपासून सक्रिय झालो.
झाले गेले विसरून जाऊ, नव्या दमाने महायुतीला निवडून देऊ…
— Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) (@DheerajGhate) October 29, 2024
काही निर्णयांवरून नाराज होणे, हा मानवी स्वभाव आहे. पण त्यातच अडकून न बसता, पुढे सरकणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. मी कायमच भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भविष्यातही राहणार. महायुतीचे पुण्यातील सर्व ८… pic.twitter.com/aknpoUz7yi
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार श्री. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला. यावेळी उपस्थित राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यात पुन्हा एकदा भाजपा -महायुतीचे सरकार आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न पुणे शहर भाजपाकडून केले जातील. ' असं ट्विट घाटे यांनी केलं आहे.
( नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांचा शेवटच्या क्षणी फोन, अर्ज भरण्यासाठी निघालेल्या पुण्यातील भाजपा उमेदवाराची माघार )
जाहीर नाराजीचं प्रदर्शन
धीरज घाटे यांनी यापूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 'तुम्हाला राज्यात हिंदुत्वाचं सरकार हवंय पण, हिंदुत्वावादी कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय ही माझी भावना, पुढचा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांशी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांशी, मला मार्गदर्शन करणाऱ्या आप्तेष्ट मंडळींशी चर्चा करुन लवकरच पक्षनेतृत्त्वाकडं माझा निर्णय मी सांगेन,' असं त्यांनी जाहीर केलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world