पुणे महानगरपालिकेच्या (PMC) 165 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. 16 जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेचा निकाल लागला. पुण्यामध्ये प्रमुख लढत ही भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जाहीरनामाही प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यामध्ये मोफत मेट्रो आणि बस प्रवासाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनानंतरही पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवला नाही हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
भाजपला स्पष्ट बहुमत
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. 165 जागांपैकी 119 जागा जिंकत भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून पुण्यात 30 जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला 15 जागा जिंकण्यात यश आले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 1 जागा जिंकता आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पाटी कोरी राहिली आहे.
पुण्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ?
- भाजप-119
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- 27
- काँग्रेस- 15
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)- 3
- शिवसेना (UBT)- 01
पुण्याचा पुढचा महापौर कोण होणार?
पुण्यामध्ये एकहाती सत्ता आल्याने पुढचा महापौर हा भाजपचाच होणार हे स्पष्ट झाले आहे, मात्र तो कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता आहे. 29 महानगरपालिकांमधील महापौरांची आरक्षण सोडत लवकरच पार पडणार आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यानुसार महापौरपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल.
पुणे महापौरपदासाठी 3 नावे चर्चेत
1. गणेश बिडकर

गणेश बिडकर हे भाजपचे निष्ठावंत असून ते नगरसेवक म्हणून यापूर्वीही निवडून आले असल्याने त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. निकालापूर्वीच पुण्यामध्ये बॅनर लागले होते, ज्यावर बिडकर यांच्या नावाचा महापौरसाहेब असा उल्लेख करण्यात आला होता. निकालापूर्वी लागलेल्या या बॅनरची पुण्यात बरीच चर्चा झाली होती. पुण्याच्या प्रभाग 24 (कसबा गणपती-केईएम हॉस्पिटल) मध्ये भाजपचे गणेश बिडकर, देवेंद्र वडके, कल्पना बहिरट आणि उज्ज्वला यादव असे पॅनेल होते. या पॅनेलने शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता.
2. राजेंद्र शिळीमकर

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र शिळीमकर यांचेही नाव महापौरपदाच्या शर्यतीत घेतले जात आहे. प्रभाग 20 (बिबवेवाडी-शंकर महाराज मठ)मधून भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे यांनी विजयी झाले, तर महेंद्र सुंडेचा मुथा यांचा पराभव झाला.
3. धीरज घाटे

भाजपचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील सभागृह नेतेपदाचा अनुभव पाठीशी असलेल्या धीरज घाटे यांचे नावही महापौरपदासाठीच्या स्पर्धेत असल्याचे सांगितले जात आहे. प्रभाग 27 (नवी पेठ-पर्वती) मधून भाजपचे धीरज घाटे, अमर आवळे, स्मिता वस्ते आणि लता गौड असे पॅनेल उभे होते. या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world