लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात (Lok Sabha Elections 2024) विदर्भातील 5 जागांवर निवडणूक होणार आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापैकी चंद्रपूरमधील लढत (Chandrapur Lok Sabha Seat) यंदा चांगलीच चर्चेत आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसनं ही एकमेव जागा जिंकली होती. त्यावेळी मोदी लाटेतही काँग्रेसच्या सुरेश धानोरकरांनी भाजपा खासदार हंसराज अहीर यांचा पराभव केला होता.
काँग्रेसला मात्र चंद्रपूरमधून अद्याप उमेदवार निश्चित करता आलेला नाही. काँग्रेसमध्ये या जागेसाठी इच्छुकांमध्ये संघर्ष सुरु आहे. तर भाजपाला अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात होणारी ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.
काय आहे इतिहास?
पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. 1952 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतरची चार दशकं चंद्रपूरवर काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1996 साली भाजपाच्या हंसराज आहिर यांनी इथून पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 मध्ये अहीर पुन्हा एकदा विजयी झाले. 2019 साली काँग्रेसनं पुनरागमन करत चंद्रपूरची जागा ताब्यात घेतली. मागील निवडणुकीत सुरेश धानोरकर यांनी अहीर यांचा पराभव केला होता. धानोरकरांचं मे 2023 मध्ये निधन झालं. त्यानंतर ही जागा रिक्त आहे. यंदाही हंसराज अहीर यांचं नाव चर्चेत होतं. पण, भाजपानं मुनगंटीवार यांची निवड केलीय.
काँग्रेस काय करणार?
भाजपानं मुनगंटीवार यांना उमेदवारी देत प्रचारात आघाडी घेतलीय. तर दुसरिकडं काँग्रेसला अद्याप उमेदवार निश्चित करता आलेला नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार किंवा दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यापैकी एकाला पक्षाची उमेदवारी मिळू शकते. मागील निवडणुकीत महाराष्ट्रात जिंकलेली एकमेव जागा आपल्याकडं राखण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी तीन जागा भाजपाकडं आहेत. दोन काँग्रेसकडं असून एका ठिकाणी अपक्ष आमदार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world