विधानसभा निवडणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विदर्भ हा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र निवडणुकीपूर्वी घडलेल्या घडामोडींमुळे विदर्भातील काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न पडायला लागला आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे विदर्भातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (NDCC) बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेतील गैरकारभार आणि नियमबाह्य कर्जवाटपाची चौकशी करण्यात येत असून यासाठी विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे. केदार यांनी या चौकशीला स्थगिती देण्याची विनंती केली होती, मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 3 डिसेंबरला घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एकीकडे ही प्रकरणे सुरू असताना भाजपशी दोन हात करणाऱ्या काँग्रेसने विदर्भात मित्रपक्षाचीही नाराजी ओढावून घेतली आहे. यालाही केदारच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
नक्की वाचा : रामटेकवरुन 'मविआ'त वादाची ठिणगी! काँग्रेसकडून बंडखोरांचा प्रचार, ठाकरे गट आक्रमक
रामटेक या मतदारसंघावरून शिवसेना(उबाठा) आणि काँग्रेसमध्ये यांच्यात खडाजंगी झाली होती. शिवसेनेने हट्ट धरून हा मतदारसंघ विशाल बरबटेंसाठी आपल्या पदरात पाडून घेतला. यामुळे इथून काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. मुळक यांना केदार यांनी उघडपणे साथ दिली असून काँग्रेसचे कार्यकर्ते बरबटेंऐवजी मुळक यांचाच प्रचार करताना दिसत आहेत. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी यासंदर्भातील काँग्रेस नेत्यांकडे तक्रारही केली होती. यावर काँग्रेसने मविआच्या उमेदवाराला पाठिंबा न दिल्यास आणि पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल.
उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेतोय!
रामटेकमधील घडामोडींबद्दल विचारलं असता सुनील केदार यांनी म्हटले की, रामटेकमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आशिष जैस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली होती. ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. जैस्वाल उद्धव ठाकरेंना वाट्टेल ते बोलले आणि आम्हाला त्याचा बदला घ्यायचा आहे. केदार यांची ही विधाने ऐकल्यानंतर सगळेच जण बुचकळ्यात पडले आहेत. ठाकरेंच्या अपमानाचा बदला, त्यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम करून कसा काय घेतला जाईल? असा प्रश्न रामटेकमधील ठाकरेंचे शिवसैनिक विचारत आहेत.
नक्की वाचा : शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?
सावनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजप उमेदवार आशिष देशमुख यांनी सुनील केदार हे केदार यांचे कडवट विरोधक मानले जातात. 2009 सालच्या निवडणुकीत देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. हा जीवघेणा हल्ला केदार यांनीच केला होता असा आरोप देशमुख यांनी सातत्याने केला आहे. देशमुख यांना विदर्भात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील ताणल्या गेलेल्या संबंधांबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, मविआतील मतभेद तीव्र मतभेदांमुळे सावनेरमध्ये मला फायदा होत आहे. काँग्रेसला आणि केदार यांच्या मनमानीला कंटाळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेही शिवसैनिक आपल्या मदतीला आल्याचे त्यांनी सांगितले. सावनेर मतदारसंघातून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या निवडणूक लढवत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world