विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळताना दिसतोय. त्यात मविआमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. अशा वेळी राज ठाकरे यांच्या मनसेचा तर पार धुव्वा उडाला आहे. मागिल दोन निवडणुकीत किमान एक आमदार तरी निवडून आला होता. पण या निवडणुकीत मनसेचा सुपडा साफ होताना दिसत आहे. त्यांचा एकही आमदार या विधानसभेत नसेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा अमित ठाकरे ही माहिम मतदार संघातून पिछाडीवर आहेत. हा राज ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसेने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात त्यांनी जवळपास 123 उमेदवार रिंगणात उतरवले होते. प्रचारा वेळी ठाकरे यांनी यावेळी आम्ही सत्तेत असू असं सांगितलं होतं. तर काही सभांमध्ये त्यांनी एकदा सत्ता आपल्या हातात द्या असं ही आवाहन मतदारांना केलं होतं. हेवा वाटावा असा महाराष्ट्र आपल्याला बनवायचा आहे असं ते सांगत होते. त्यासाठी सत्ता द्या असंही ते म्हणत होते. पण त्यांचे हे आवाहन मतदानांनी मात्र साफ धुडकावून लागताना दिसत आहे. मनसेचा या निवडणुकीत सुपडासाफ झाला आहे.
बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, अविनाश जाधव, राजू पाटील हे निवडून येतील अशी शक्यता होती. पण हे सर्व जण पिछाडीवर आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचार सभांनाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्याचे रुपांतर मतात झालेले दिसत नाही. काही उमदेवारांना तर आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही अशी स्थिती आहे. राज ठाकरे यांची सतत बदलणारी भूमिका याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसलेला दिसतो. शिवाय जनतेशी असावा लागणारा टच कुठेही नव्हता. निवडणूका आल्या की सभा घ्या म्हणजे मतं मिळतात हा समज जनतेने खोटा ठरवला आहे असचं या निकालातून दिसत आहे.
ट्रेंडिंग बातमी - देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर
यंदा झालेली विधानसभा निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची लढाई आहे. मान्यता टिकविण्यासाठी मनसेला या निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे. 123 जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मतं मिळवावी लागतील. मनसेला ही अट पूर्ण करता आली नाही तर अधिकृत पक्ष म्हणून मनसेची मान्यता धोक्यात येईल. शिवाय त्यांचे चिन्ही ही जाईल. अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जरी उमेदवार निवडून नाही आले तर किमान तीन टक्के मतं त्यांना घ्यावी लागतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world