गुरु दळवी, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांसाठी मागील पंधरा दिवसापासून सुरु असलेला सर्व उमेदवारांचा प्रचाराचा धडाका आज (सोमवार, 18 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजता समाप्त झाला. मागील पंधरा दिवसात प्रचार सभा, रॅली, पदयात्रा अशा अनेक प्रकारे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. निवडणूक प्रचाराचा तोफा थंडावल्या असल्या तरी वादाची धग कायम असून ती पेटण्याची शक्यता कोकणातील कुडाळ मतदारसंघात निर्माण झालीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी (20 नोव्हेंबर) रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वीचे हे दोन दिवस उमेदवारांसाठी फार महत्त्वाचे असतात. या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांचे पथके, पोलीस यंत्रणा, स्थिर आणि फिरती फथक अधिक प्रमाणात सक्रीय असतील. गुप्त बैठका, भेटगाठींवर नजर ठेवण्याचं काम हे पथक करतील.
(नक्की वाचा: गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांसाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची का आहे?)
विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचबरोबर अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत. राज्यात यंदा होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कुडाळ विधानसभा मतदारसंघाचं स्थान महत्त्वाचं आहे. कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात लढत होत आहे. वैभव नाईक यांची ही तिसरी निवडणूक आहे. तर निलेश राणे यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे वैभव नाईक यांनी 2014 साली कुडाळमधून नारायण राणेंचा पराभव केला होता. 10 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे उत्सुक आहे.
(नक्की वाचा: 'महिलांना रेल्वे प्रवास मोफत करा', उद्धव ठाकरेंची PM मोदींकडं मागणी)
राणे-नाईक आक्रमक
कुडाळमध्ये निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यात, पण प्रतिस्पर्धी नेत्यांमधील आक्रमकता कायम आहे. निलेश राणे यांचे वडील आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर मोठा आरोप केलाय. हे. वैभव नाईक हे आज रात्री पैसे वाटप करणार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे."आजच्या रात्री विरोधक पैसे वाटणार आहेत जे वाटप करणार त्यांना मार पडणार आहे. मी पेट्रोलिंग करणार आहे' , असा इशारा राणेंनी दिलाय.
राणेंनी इशारा देताच वैभव नाईक देखील आक्रमक झालेत. त्यांनी राणेंना प्रतिआव्हान दिलंय. मी नाहीतर नारायण राणे हेच आज पैसे वाटणार असल्याचं वैभव नाईक म्हणाले. 'आपण एकत्र पेट्रोलिंग करुया कुणालाच पैसे वाटायला नका देऊ,' असं थेट आव्हान वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना दिलंय. राणे आणि नाईक दोघंही आक्रमक मुडमध्ये असल्यानं कुडाळमध्ये मतदानापूर्वी काय घडणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world