बारामती विधानसभा निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही काका-पुतण्यांविरोधात लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा. बारामती म्हटल्यावर कुणाचं नाव घेतात? आता युगेंद्र पवार तीच परंपरा कायम ठेवतील. त्यामुळे त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा. आम्ही ज्या पद्धतीने विकास केला त्याच्यापेक्षाही अधिक जोमाने युगेंद्र पवार विकास करतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पवार?
बारामतीमध्ये झालेली लोकसभा निवडणूकही यंदा लक्षवेधी ठरली होती. त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. शरद पवारांनी भाषणात त्या निकालाचा उल्लेख केला. लोकसभेची निवडणूक आपण या ठिकाणी केली, या जागेवर लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची जाहीर सभा तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आयोजित केली आहे. लोकसभेचा निकाल देशाला महाराष्ट्र म्हणजे काय चीज आहे, हे दाखवणारा ठरला, असं पवार म्हणाले.
मोदी सरकारवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 400 खासदार निवडून द्या असं आवाहन करत होते. देशाचा कारभार करण्यासाठी 400 खासदार लागत नाहीत. 250-300 देखील पुरेशे असतात. पण, बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान बदलण्यासाठी 400 खासदार आवश्यक होते. मोदींचा राज्यघटना बदलण्याचा विचार होता, ते सामान्य मतदारांना पटलं नाही, असा दावा पवारांनी केला.
( नक्की वाचा: 'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद )
महाराष्ट्राच्या निवडणुकीत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला, लाडकी बहीण... बहिणीचा सन्मान करायचा असेल तर माझी काही तक्रार नाही, एका बाजूला लाडकी बहीण म्हणायची आणि दुसरीकडं महिलांची अवस्था काय? दोन वर्षात महिलांवर अत्याचार किती झाल्या याची आकडेवारी तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात महिला, मुली कुठं गेल्या याचा थांगपत्ता लागत नाही, 64 हजार महिला मुली राज्यातून बेपत्ता आहेत, असा आरोप त्यांनी केला.
बारामती आणि आजूबाजूचा भाग शेती करणाऱ्य़ा लोकांचा भाग आहे. इथं फळबाग आहे, अनेक प्रकारची पीकं आपण घेतो. शेतकरी महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांची स्थिती राज्यात काय? या सरकारच्या काळात 20 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केली. शेतीमालाची किंमत मिळत नाहीत, कर्जबाजारीपणा वाढला, हे शेतकऱ्यांचं दुखणं आहे, असं पवार म्हणाले.
नव्या पिढीला संधी द्या
आम्ही तरुण पिढीच्या हातामध्ये सत्ता द्यायचं ठरवलं. युगेंद्र पवार यांचं शिक्षण अमेरिकेत झालंय. ते शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कारखान्यात लक्ष घातलं, त्यांची मनापासून लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. त्यांना बारामतीचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा विधानसभेत पाठवा, असं आवाहन पवारांनी केलं.
अजित पवारांना पक्षानं संधी दिली. त्यांना 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं आता पुढं काय करायचं, माझी पिढी, माझ्यानंतर अजितची पिढी आता युगेंद्रची पिढी... पुढच्या पिढीकडं सूत्रं द्या. गेल्या काही महिन्यात तालुक्यातील गाव-न गाव त्यांनी फिरुन त्यांनी मतदारांशी संवाद केला आहे. लोकांचे प्रश्न समजून घेण्याची त्यांची इच्छा आहे, असं पवार म्हणाले.