जाहिरात
Story ProgressBack

विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? कोणता उमेदवार धोक्यात? आकडेवारीसह समजून घ्या समीकरण

Vidhanparishad Election 2024 : विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

Read Time: 4 mins
विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? कोणता उमेदवार धोक्यात? आकडेवारीसह समजून घ्या समीकरण
मुंबई:

विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. दोन वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीनंतरच राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली. शिंदे भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. आता दोन वर्षांनी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या दोन आघाडींमधील कुणाचा उमेदवार पडणार? लोकसभा निवडणुकीनंतरच्या बदललेल्या संख्याबळाचा कुणाला फायदा होणार? हे सर्व समजून घेऊया

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणत्या पक्षाचे उमेदवार रिंगणात?

विधान परिषद निवडणुकीतील 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहे.  

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर

कशी होते निवडणूक?

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष मतदानानं होते. यामध्ये मतदार आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधी हे निवडून देतात. विधानपरिषदेची निवडणूक ही अप्रत्यक्ष पद्धतीनं होते. विधानसभेतील आमदारांमधून विधानपरिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी मतांचा कोटा निश्चित असतो. तो कोटा पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं.

काय आहे मॅजिक फिगर?

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं कोटा ठरतो. राज्य विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ 274 वर आलं आहे.

विधानसभेच्या एकूण जागा 274 जागांचा रिक्त जागा 11 +1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे 23 ही या निवडणुकीतील मॅजिक फिगर आहे.

( नक्की वाचा : पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर )
 

महायुतीचं संख्याबळ काय?

महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून भाजपाचे 111 आमदार आहेत.  भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली असून सध्याचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार निवडून येतील असं मानलं जातंय.

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेचं संख्याबळ 47 आहे. या संख्याबळाच्या जोरावर काही धक्कादायक निकाल लागला नाही तर त्यांचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीनंही 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला दोन्ही जागा जिंकण्यासाठी आणखी 7 आमदारांची गरज आहे.

( नक्की वाचा : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, खर्गेंनी केली घोषणा )
 

महाविकास आघाडीचं संख्याबळ

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतर काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. 

महायुतीचे एकूण 202, महाविकास आघाडीचे 66 आमदार आहेत. 6 आमदार तटस्थ आहेत. त्यामध्ये  एमआयएम - 2, समाजवादी पार्टी - 2, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी -1 आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष- 1 असे 6 आमदार तटस्थ आहेत. हे आमदार या कुणाला मतदान करणार यावरही निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचा खेळ

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. त्यामुळे आमदार त्यांची दुसरी आणि तिसरी पसंत कुणाला देतात हे देखील महत्त्वाचं असेल. विधानपरिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत. ही निवडणूक देखील त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोणते 11 उमेदवार विजयी होणार? पराभूत होणारा उमेदवार कोण असेल? हे अगदी शेवटच्या क्षणी समजेल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे थेट काँग्रेस कार्यालयाकडे निघाले, धनंजय मुंडेंनी आवाज दिला अन्...
विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? कोणता उमेदवार धोक्यात? आकडेवारीसह समजून घ्या समीकरण
BRITAIN General Election voting battle of vote between Rishi Sunak and Sir Keir Starmer
Next Article
भारताच्या जावईबापूंचे भवितव्य पणाला, इंग्लंडमध्ये मतदानाला सुरुवात
;