विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Dr Pradnya Rajeev Satav) यांना उमेवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. सातव यांच्या नावाची घोषणा केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत सातव?
डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं.
प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारपर्यंत (2 जुलै) आहे.
हिंगोलीत पडसाद
दरम्यान, दरम्यान, प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे पडसाद हिंगोलीमध्ये उमटले आहेत. हिंगोलीतील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अब्दुल हपीज अब्दुल रहेमान राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. हिंगोलीतील पक्षाचे पदाधिकारी देखील राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. सातव यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा निर्णय चुकीचा आहे, अशी टीका रहेमान यांनी केली आहे.
भाजपाचे उमेदवार जाहीर
भारतीय जनता पक्षानं विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महिनाभरातच भाजपानं त्यांना विधानपरिषदेवर संधी दिलीय. आगामी विधानसभा निवडणुकीतील समीकरणांचा विचार करुन पंकजा यांना उमेदवारी दिली असल्याचं मानलं जात आहे.
( नक्की वाचा : पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world