गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेलं महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर झालंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये याबाबत अनेक बैठका झाल्या. या सर्व बैठकांनंतर अखेर शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालंय. या तीन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एकत्र पत्रकार परिषद घेत तशी घोषणा केलीय. मविआमधील जागावाटप जाहीर होत असताना सांगली आणि भिवंडी या दोन जागा कुणाला मिळणार याची सर्वांना उत्सकुता होती. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्या दोन्ही जागांवर काँग्रेसची निराशा झाली आहे.
सांगलीवरील दबावतंत्र फेल
वसंतदादांचा हा गड जागावाटपाच्या वाटाघाटीमध्ये काँग्रेसनं गमावला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील आता सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित होण्याआधीच शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. या निर्णयाचे काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली होती. ही जागा काँग्रेसकडंच राहील असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला होता. शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातही सांगलीच्या मुद्यावर शाब्दिक चकमक झाली होती. 'काँग्रेस पक्ष सांगलीसाठी पंतप्रधानपद गमावणार आहे का?' हा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. अखेर राऊत यांचं हे दबावतंत्र यशस्वी झालं असून सांगलीची जागा काँग्रेसनं गमावली आहे.
नक्की वाचा : संजय राऊतांवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज का?
मुंबईत पिछेहाट
सांगलीप्रमाणेच मुंबईतही काँग्रेसला जागावाटपात नुकसान सहन करावं लागलं आहे. मुंबईतील सहापैकी फक्त दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही होत्या. माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही जागा पक्षाला हवी होती. पण, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल देसाई यांच्यासाठी ही जागा आपल्याकडं खेचण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे.
वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबईमधील धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलंय. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे या मतदारसंघाचे खासदार होते. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीतही ही जागा काँग्रेसकडं होती. पण, महाविकास आघाडीच्या जागावाटपात इथंही काँग्रेला निराशा सहन करावी लागलीय.
राज ठाकरे लोकसभेबाबत मोठा निर्णय घेणार? तडजोड की थेट भिडणार?
ठाणे जिल्ह्यातून आऊट
मुंबईच्या शेजारच्या भिवंडीतही काँग्रेसचा हात रिकामा राहिलाय. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे निवडणूक लढवणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि पालघर या जागा शिवसेनेकडं आहेत. तर भिवंडीची जागाही राष्ट्रवादीकडं गेल्यानं मुंबईजवळच्या या महत्त्वाच्या जिल्ह्यातून काँग्रेस आऊट झालीय.
गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालीय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फुटीचा धक्का सहन करावा लागलाय. महाविकास आघाडीत असलेल्या या दोन्ही पक्षाच्या गटांना अधिकृत चिन्ह मिळालेलं नाही. त्यानंतरही या दोन्ही पक्षांनी महत्त्वाच्या जागा आपल्याकडं राखत एकसंघ काँग्रेसला बॅकफुटवर ढकललं आहे.