जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले,  माण विधानसभेत कोणाचं असेल आव्हान?

2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही, यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांनी शड्डू ठोकला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
सातारा:

सुजित आंबेकर, प्रतिनिधी

जिल्ह्याच्या पूर्व भागात असणारे माण खटाव हे दोन तालुके कायम चर्चेत असतात ते इथल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या दुष्काळामुळे. केवळ दोन तालुक्यात चारा छावण्या असणारे हे देशातले एकमेवाद्वितीय असे तालुके म्हणावे लागतील. या तालुक्याचं राजकारणही कायम या दुष्काळाच्या समस्यांच्या अवतीभोवती फिरत आलं आहे. माण मतदारसंघात काही गावं अशी आहेत ज्यांचा माढा या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. लोकसभेला माढा मतदारसंघात असणारा खटाव तालुक्यातील काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वापरला. त्यामुळेच या मतदारसंघातून शरद पवारांसारखे राष्ट्रीय नेते निवडून येऊनही इथली जलसंधारणाची कामं होऊ शकलेली नाहीत.

माण मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore in Man Constituency) चौथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे रिंगणात उतरलेत. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. जयकुमार गोरेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरेल. ते कोणाच्या पारड्यात मते टाकणार की बंधूच्या पाठीशी उभे राहणार, हे महत्त्वाचे आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Nanded Assembly : लेक की राजकीय शिष्य? अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात कोणाचा 'जयजयकार' 

सातारा जिल्ह्यातील हा दुष्काळी तालुका याच जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुभवणाऱ्या महाबळेश्वरपासून केवळ 50 किलोमीटरच्या हवाई अंतरात येतो. आजूबाजूच्या तालुक्यात पाण्याचे कालवे झाले, मात्र हा तालुका आजही तहानलेला आहे. माणसांसह जनावरंही मेटाकुटीला आली आहेत. अशा या विधानसभा मतदारसंघाचे गेल्या तीन टर्मपासून भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी इथलं जनमत आपल्या बाजूला ठेवण्यात यश मिळवलं आहे. यंदा मात्र विरोधकांचे त्यांना कडवे आव्हान असणार आहे. 2019 मधील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे आणि अपक्ष निवडणूक लढवलेले प्रभाकर देशमुख यांच्यात चांगलीच लढत झाली होती, मात्र जयकुमार गोरेंनी बाजी मारली होती. यंदा मात्र जयकुमार गोरे आणि प्रभाकर घार्गे यांच्यात तगडी फाईट होत आहे. यावेळी प्रभाकर देशमुख, शेखर गोरे, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख यांची भूमिका निर्णय ठरणार आहे. 

Advertisement

2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही, यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांनी शड्डू ठोकला असून त्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जयकुमार गोरे 91,469 मते मिळवून विजयी झाले होते. अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची 88,426 मते मिळाली होती. प्रभाकर देशमुख यांचा 3046 मतांनी पराभव झाला होता. या मतदार संघाचा भौगोलिक अभ्यास केला तर या ठिकाणी नागरिकांच्या दहा एकरपासून ते शंभर एकरपर्यंत जमिनी आजही आहेत. काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमिनी पाण्याची कमतरता असल्याने पडून आहेत आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी पदांची झालर आपल्या गळ्यात पाडून घेतली. मात्र, आज अखेर तुरळक पाण्याचे डोह तयार करण्यापलीकडे या मतदारसंघात कोणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही.

Advertisement

नक्की वाचा - उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी

पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलनं आजही पाहायला मिळतात. निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरुन स्टेज गाजत असले तरी मुळात या भागात अनेक निवडणुका या जाती-पातीवरुन झालेल्या पाहायला मिळत आल्या आहेत आणि या जातीची गणितं आजही गावागावातील बैठकांमध्ये दिसून येतात. माणच्या या मतदारसंघात मराठा, माळी, धनगर या समाजाची लोकसंख्या आणि जास्त आहे. या मतदारसंघात भाऊसाहेब गुदगे यांच्यानंतर 25 वर्ष मराठा आमदार लाभला नाही अशा आरोपाखाली कोपरा बैठकांमध्ये प्रचार करताना अनेक नेते मंडळी पाहायला मिळत आहे. जयकुमार गोरे यांना पाडण्यासाठी तिन्ही टर्मला हा फॉर्म्युला वापरला गेला. यंदाही त्याचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसेल. त्यात धनगर समाजाचं नेतृत्त्व करणाऱ्या सत्तेतील महादेव जानकरांचीही पकड कमी पडल्याचे गेल्या निवडणुकांमध्ये दिसून आलं. 

या मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्ते आणि ठेकेदारांकडून होणारे दबावाचे आणि ठोकशाहीचे राजकारण असे अनेक मुद्दे त्यांच्या निवडणुकीवर परिणाम करतील असे आहेत. हेच मुद्दे घेऊन विरोधक एकत्र येत त्यांच्यावर सध्या जोरदार टीका करत आहेत. हे मुद्दे आगामी विधानसभा निवडणुकीत पेटल्यास जयकुमार गोरेंना निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे जयकुमार गोरे यांना विजयी चौकार ठोकायचा असल्यास दुसरीकडे गटातटाच राजकारण आणि पक्षांतर्गत कुरुबुरी यावर तोडगा काढावा लागेल. माण-खटाव ची लढत प्रतिष्ठेची बनली असून आमदार जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठी व गोरेंचा विजयीरथ थांबवण्यासाठी महाविकास आघाडी पुढे मोठे आव्हान असणार आहे.