Modi 3.0 : माजी IPS अधिकारी, तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष; राज्याचा 'सिंघम' घेणार मंत्रिपदाची शपथ 

एकेकाळी तामिळनाडूच्या पोलीस सेवेत 'सिंघम' नावाने ओळख असलेले माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांनी राज्यात लोकांचा कौल भाजपकडे वाढवण्याचं कठीण काम आपल्या हातात घेतलं आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

भारतीय जनता पक्षाने 2024 च्या निवडणुकीत दक्षिणेतील राज्यांवर फोकस केला होता. तामिळनाडूवरही भाजप लक्ष ठेवून होतं. मात्र भाजपला तेथून एकाही जागेवर यश मिळवता आलेलं नाही. मात्र अशाही परिस्थिती वोट शेअरमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. याचं सर्वाधिक श्रेय तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांना जातं. एकेकाळी तामिळनाडूच्या पोलीस सेवेत 'सिंघम' नावाने ओळख असलेले माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांनी राज्यात लोकांचा कौल भाजपकडे वाढवण्याचं कठीण काम आपल्या हातात घेतलं आहे. 39 लोकसभा मतदारसंघ असलेल्या तामिळनाडूमध्ये भाजपने 22 जागा लढवल्या. त्यांचा एकही खासदार निवडून आला नसला तरी भाजपचा वोट शेअर 3.6 वरून 11.24 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

अण्णामलाई यांनी स्थानिक पातळीवर केलेली कामं आणि मक्कल पद यात्रेचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवर पाहायला मिळालं. भाजपने 2021 मध्ये केवळ 36 व्या वर्षी के. अण्णामलाई यांना पक्षाचं प्रदेश अध्यक्षपद देण्यात आल्यानंतर अनेकजण हैराण झाले होते. अण्णामलाई यांनी तामिळनाडूत भाजपला वाढवण्यासाठी 39 लोकसभा मतदारसंघात, 234 विधानसभा मतदारसंघात 1,770 किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला, ज्याला 'एन मन एक मक्कल (माझी भूमी, माझे लोक)' नाव देण्यात आला. यादरम्यान त्यांनी स्थानिक पातळीवर भाजपसाठी बरंच काम केलं. 

तामिळनाडूमध्ये यंदाच्या लोकसभेत डीएमकेने 23, काँग्रेसचे 9 खासदार विजयी झाले आहेत. भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. मात्र अण्णामलाई येथे स्थानिक पातळीवर काम करताना दिसत आहेत. नागरिकांना जोडून घेण्यासाठी अण्णामलाई अनेक रणनीती आखत आहे. अण्णामलाई स्वत:ला उंगल वेट्टू आणि उंगल थम्बी (तुमचा मुलगा आणि तुमचा लहान भाऊ) म्हणवून घेतात. यानिमित्ताने त्यांनी लोकांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. 

नक्की वाचा - Modi 3.0 : माजी IPS अधिकारी, तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष; राज्याचा 'सिंघम' घेणार मंत्रिपदाची शपथ 

आयपीएस अधिकारी ते तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष...
39 वर्षीय अण्णामलाई बंगळुरूत पोलीस उपायुक्त होते. दहा वर्षे पोलीस दलात सेवा दिल्यानंतर ते राजकारणात उतरले. विविध भाषांमधील उत्तर संवादकौशल्य ही त्यांची जमेची बाजू. प्रशासकीय सेवेत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग अण्णामलाई यांनी तामिळनाडूतील नागरिकांना भाजपशी जोडून घेण्यासाठी केला. काही महिन्यांपूर्वी अण्णा द्रमुक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले. यामागे अण्णामलाई यांचं वक्तव्य कारणीभूत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र यासाठी भाजप श्रेष्ठींनी अण्णामलाईंची पाठराखण केली.  

Advertisement

संघ परिवाराच्या बाहेरून येत अण्णामलाईंनी तामिळनाडूत भाजपचं वजन निर्माण केलं आहे. पुढील दोन वर्षात म्हणजे 2026 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यासाठी अण्णामलाईंची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. सध्या येथे भाजपचे चार आमदार आहेत. गेल्या पाच दशकात येथील राजकारण दोन द्रविड पक्षांभोवती फिरत होतं. मात्र आता तामिळनाडूतील राजकारणात आणखी एक स्पर्धक आला आहे. तामिळनाडूतील त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद झाली होती, यावेळी जमिनीवर बसून टिपण घेत असलेल्या अण्णामलाई यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.