महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महायुतीत राज्यात भाजपच्या वाट्याला जास्त जागा येणार हे जवळपास स्पष्ट आहे. मात्र मुंबईचा बॉस कोण हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मुंबई आणि शिवसेना हे नेहमीच समिकरण राहीलं आहे. मुंबईत शिवसेनेनं आतापर्यंत भाजपपेक्षा जास्त जागा लढवल्या आहेत. शिवाय भाजप पेक्षा जास्त जागा ही जिंकल्या आहेत. मात्र मागिल निवडणुकीत हे गणित बिघडले. भाजपने शिवसेने पेक्षा जास्त जागा जिंकत मुसंडी मारली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मोठा भाऊ होण्याची संधी भाजपला आहे. त्यामुळे महाराष्ट्रा प्रमाणे मुंबईतही भाजप जागा वाटपात सरस राहील अशी स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना पहिल्यांदाच मुंबईत कमी जागा लढेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्या पैकी तब्बल 22 जागा भाजप लढणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पारड्यात केवळ 11 जागा पडणार आहेत. तर अजित पवारांच्या वाट्याला 3 जागा येणार आहेत. त्यामुळे मुंबईत शिंदेंच्या शिवसेने पेक्षा ठाकरेंची सेना सरस असलेली पाहायला मिळणार आहे. मुंबईत ऐवढ्या कमी जागा कधीही शिवसेना लढली नाही. शिवसेनेचा गड म्हणूनच मुंबईकडे पाहिले गेले आहे. मात्र महायुतीत यागडाला भाजपने तडा देत जागा वाटपात तरी बाजी मारली आहे हे स्पष्ट होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता
मुंबईत 2019 ला झालेल्या विधानभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. मुंबईत युतीने मुसंडी मारली असली तरी भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपने 16 जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेनं 14 जागांवर भगवा फडकवला होता. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेसने 4 जागांवर विजय मिळाला होता तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. समाजवादी पार्टीचा एक आमदार विजयी झाला होता.
ट्रेंडिंग बातमी - नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?
महायुतीत भाजपच मोठा भाऊ असणार हे स्पष्ट आहे. मात्र त्याच बरोबर मुंबईत शिंदे सेनेची तेवढी ताकद नाही हेही या जागा वाटपातून स्पष्ट होत आहे. एकसंध शिवसेना असताना मुंबई बाबत भाजप बरोबर जागा वाटपात कधीही तडजोड केली गेली नाही. यावेळी मात्र शिंदेंना तडजोड करावी लागत आहे हे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतल्या जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंची ताकद मुंबईत आहे हे नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी भाजप विरूद्ध ठाकरे सेना अशी लढत पाहायला मिळेल.