BMC Election Result 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. 16 जानेवारी रोजी सगळ्या महानगरपालिकांसाठीची मतमोजणी पार पडली. मुंबईतील अंतिम निकाल रात्री उशिरा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि तसेच घडताना दिसले. संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल लागू शकला नव्हता. निकालाची अंतिम आकडेवारी हाती येण्यास रात्र होईल अशी शक्यता आहे.
नक्की वाचा: Latur Election Result 2026 : लातूरमध्ये देशमुखच धुरंधर, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर
227 जागांपैकी 68 निकाल जाहीर
मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत सुरूवातीला 68 जागांचे निकाल स्पष्ट करण्यात आले होते. यामध्ये भाजपचे 24 उमेदवार विजयी झाल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 21 उमेदवार विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 10 उमेदवार विजयी झाले होते, काँग्रेसचे 7 उमेदवार विजयी झाले होते तर मनसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झाले होते.
नक्की वाचा: PMC Election Result: आंदेकर गँगचा मोठा विजय! सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर विजयी; धंगेकरांना धक्का
मराठी पट्ट्यात कोणी मारली बाजी
मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची येणार याची गेला महिनाभर उत्सुकता निर्माण झालेली होती. मराठी मतदार हा निर्णायक ठरणार असून तो ज्याच्या पारड्यात आपले मत टाकेल त्याचा विजय होईल असे बोलले जात होते. दादर वरळी भागात कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकला याची आम्ही यादी तयार केली. आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती तयार करण्यात आलेली असून यातील काही जागांचे निकाल हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाहीत. दादर-वरळी पट्ट्यात कोणत्या पक्षाचे उमेदवार विजयी झालेत त्याची यादी पाहा.
- वॉर्ड क्रमांक190- शीतल गंभीर (भाजप)
- वॉर्ड क्रमांक 191- विशाखा राऊत (शिवसेना,उबाठा)
- वॉर्ड क्रमांक 192- यशवंत किल्लेदार (मनसे)
- वॉर्ड क्रमांक 193- हेमांगी वरळीकर (शिवसेना,उबाठा)
- वॉर्ड क्रमांक 194- निशिकांत शिंदे (शिवसेना,उबाठा)
- वॉर्ड क्रमांक 195- विजय भणगे (शिवसेना,उबाठा)
- वॉर्ड क्रमांक 196- पद्मजा चेंबूरकर (शिवसेना,उबाठा)
- वॉर्ड क्रमांक 197- वनिता नरवणकर (शिवसेना, एकनाथ शिंदे)
- वॉर्ड क्रमांक 198 अबोली खाडे (शिवसेना,उबाठा)
- वॉर्ड क्रमांक 199 किशोरी पेडणेकर (शिवसेना,उबाठा)
सदा सरवणकर यांना दुहेरी धक्का
एकूण 10 जागांचे हे निकाल पाहिल्यास शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळवता आली आहे. या पट्ट्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांना बसला. सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर हा वॉर्ड क्र.194 मधून निवडणूक लढवत होता. सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर-गुरव ही वॉर्ड क्र.191 मधून निवडणूक लढवत होती. समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर या दोघांचाही पराभव झाला आहे. सदा सरवणकर यांनी 2024 साली विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यांचा या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी पराभव केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world