जाहिरात

Akola News : अकोला महापौरपदासाठी 13 जणी रिंगणात, सत्तासमीकरणे निर्णायक टप्प्यावर; कोण होणार महापौर?

महानगरपालिकेत यंदा महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होताना दिसत असून भाजपकडे तब्बल १३ ओबीसी महिला इच्छुक उमेदवार आहेत.

Akola News : अकोला महापौरपदासाठी 13 जणी रिंगणात, सत्तासमीकरणे निर्णायक टप्प्यावर; कोण होणार महापौर?

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola News : महानगरपालिकेत यंदा महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होताना दिसत असून भाजपकडे तब्बल १३ ओबीसी महिला इच्छुक उमेदवार आहेत. वैशाली शेळके, पल्लवी मोरे, योगिता पावसाळे, मंजुषा शेळके, शिल्पाताई वरोकार, रश्मी अवचार, निकिता देशमुख, सोनाली अंधारे, शारदा खेडकर, नीतू जगताप, माधुरी शिरसागर, प्राची काकड आणि कल्पना गोटफोडे अशी नावे भाजपकडून चर्चेत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी कडून जयश्री बहादुरकर, काँग्रेसकडून निखत शाहीन अफसर कुरेशी, जैनब बी शेख इब्राहीम, अरशीया परविन मोहम्मद शारीक, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पूजा गावंडे, तर उद्धव ठाकरे गटाकडून सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या उमेदवार रिंगणात आहेत.

संख्याबळ अपुरे; सत्तेसाठी जोरदार डावपेच

अकोला महापालिकेच्या ८० सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ४१ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपकडे सर्वाधिक ३८ जागा असून बहुमतासाठी अजून तीन नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसकडे २१, उद्धव ठाकरे गटाकडे ६, वंचित बहुजन आघाडीकडे ५, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ३, एमआयएमकडे ३ तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे प्रत्येकी १ जागा आहे. याशिवाय १ अपक्ष आणि १ महानगर विकास आघाडीचा नगरसेवक निवडून आल्याने सत्तासमीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

उद्या स्पष्ट होणार चित्र; अकोल्याला मिळणार नवा महापौर

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू असून भाजपकडून विशेष गोपनीयता पाळली जात आहे. मागील निवडणुकीत भाजपला ४८ जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा तो आकडा घसरल्याने मित्रपक्षांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. अकोट नगर परिषदेत झालेल्या एमआयएम–भाजप युतीचा परिणाम अकोल्यात झाल्याचीही चर्चा आहे. ओबीसी महिला आरक्षणामुळे महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून उद्यापर्यंत अकोल्याचा पुढील महापौर कोण होणार, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com