जाहिरात

Nanded News : अपक्ष महिला उमेदवारावरुन शिवसेनेत फूट, शिंदेंचे आमदारांमध्ये जुंपली; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

असं काय घडलंय नांदेडमध्ये आणि दोन आमदारांमधील वादाचा फटका शिवसेनेला बसणार का?

Nanded News : अपक्ष महिला उमेदवारावरुन शिवसेनेत फूट, शिंदेंचे आमदारांमध्ये जुंपली; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Nanded News : एका अपक्ष महिला उमेदवारावरुन नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच जुंपलीय. शिंदेंचे दोन आमदार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. आमदार हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांच्यात जोरदार नाराजीनाट्य रंगलंय. त्यामुळे नांदेडमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र बुचकुळ्यात पडलेत. असं काय घडलंय नांदेडमध्ये आणि दोन आमदारांमधील वादाचा फटका शिवसेनेला बसणार का? पाहूया

नांदेड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यातील मतभेदांमुळे पक्षात अस्वस्थता पसरली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार मीनल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार हेमंत पाटील यांनी केलं आहे. इतकंच नाही तर मीनल पाटलांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचंही जाहीर केलं. याच प्रभागात आमदार बालाजी कल्याणकर यांनी श्याम कोकाटे यांच्या परिवारातील उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं शिवसेनेतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. 

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण

नक्की वाचा - Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण

शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष

मीनल पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानंतरही आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबुराव पाटील कोळेकर यांनी मीनल पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडत शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केल्याचा दावा केला. या प्रकारामुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. हेमंत पाटील यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे. या प्रकारानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्याला अतिशय दुःख झाल्याची प्रतिक्रिया दिली. तर चांगलं काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, त्या आमच्याच आहेत, असं म्हणत पाटील, कदम यांनी आपण पाठिंब्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.

शिवसेना आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका

राज्यात महायुती असली तरी नांदेडमध्ये शिवसेना-भाजप हे वेगळे लढत आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीत तर काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होते. नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहे. ज्या प्रभागात पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, त्याच प्रभागात एका आमदाराने अपक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केलंय. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्ते मात्र चांगलेच बुचकुळ्यात पडले आहेत. अशावेळी शिंदेंच्या आमदारांमधील सुप्त संघर्षाचा फटका पक्षाला बसणार का? हे लवकरच कळेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com