लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आम्हाला त्यांच्यात घ्यायचेच नव्हते. शिवाय आम्ही ठाकरेंच्या डिझाईनला बळी पडलो असा धक्कादायक खुलासा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NDTV मराठीनं 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'ठाकरेंच्या डिझाईनला आम्ही बळी पडलो'
प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीवेळी काय झालं याचा मोठा खुलासा केला आहे. लोकसभेला आम्हाला इंडिया आघाडीत जायचं होतं. मात्र मविआतील पक्षांना आम्हाला घ्यायचे नव्हते हे वास्तव आहे. आम्ही त्यावेळी आम्हाला किती जागा देणार हे लेखी द्या असे सांगत होतो. पण आम्हाला कधी ही लेखी दिले गेले नाही. संजय राऊत वेगवेगळी विधाने करत होते. कधी सात जादा देणार, कधी पाच जागा देणार कधी एक जागा देणार असे सांगत होते. राजकारणात कधीही व्हिक्टीम कार्ड खेळाचे नसते. तेच नेमके आमच्या बरोबर झाले. ठाकरेंच्या डिझाईनला आम्ही बळी पडलो अशी स्पष्ट कबुली प्रकाश आंबेडकर यांनी दिला. त्यामुळेच आम्हाला वेगळं व्हावं लागलं असंही ते म्हणाले. दरम्यान भाजप नेते आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली आहे हे वास्तव असल्याचा दावाही त्यांनी पुन्हा एकदा केला.
'किंग मेकरवर विश्वास नाही'
किंग मेकरच्या या संकल्पनेवर आपला विश्वास नाही असे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राजकारणात जनता ही किंग मेकर असते असंही ते म्हमाले. गेल्या 40 वर्षात राजकीय पक्षांना जनतेने बरेच काही शिकवलं आहे. राजकीय पक्ष कधीच जनतेला शिकवू शकत नाही. मुंबईतल्या माणसांना सरकारची गरज नाही. तर सरकारला मुंबईकरांची गरज आहे. असं सांगताना जनता आधी बदलते नंतर पक्ष बदलतात. राजकीय पक्ष हे जनते पेक्षा मागे आहेत, असे सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
'जरांगेंकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त'
राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे. मात्र असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यात तथ्य नाही. उलट दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्याकडे जेवढे उमेदवार इच्छुक होते त्यांची संख्या किती तरी जास्त आहे. त्यामुळे आघाडी विरुद्ध युती हे चित्र खरं नाही. सध्याच्या स्थितीत कोणालाही बहुतम मिळणार नाही अशी स्थिती आहे. त्यात जरांगे किती उमेदवार रिंगणात ठेवणार आहेत त्यानंतर स्थिती खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल असं ही ते म्हणाले. दरम्यान जरांगे यांच्या बरोबर आपले संबध चांगले आहेत. पण जरांगे यांनी आपली पहिली भूमीका बदलली आहे. त्यांची सध्याची भूमीका ही संपूर्ण पणे राजकीय आहे असा आरोपही त्या निमित्ताने त्यांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत ओबीसी मराठांना मतदान करणार नाहीत तर मराठा हे ओबीसींना मतदान करणार अशी स्थिती आहे असे ते म्हणाले.
'राजकारणात नागडं व्हायची वेळ आली तरी...'
राजकारणात नागडं व्हायची वेळ आली तरी झालं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले. लोकांसाठी हे करावच लागेल, कारण चारित्र्य स्वच्छ आहे. पण सध्या दुसरं नेतृत्व होवू दिलं जात नाही. मोदीनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे ही नाही. जे नेतृत्व आहे ते डागाळलेले आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक नेतृत्व निर्माण केले जात नाही. इंडिया आघाडीत जर आम्ही असतो तर भाजप 200 जागा पेक्षा कमी जागा आल्या असत्या असे ही प्रकाश आंबेडकर यावेळी आवर्जून सांगितले.दरम्यान शरद पवार आणि दाऊद भेटीची चौकशी का केली जात नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
'जागा वाटप म्हणजे मराठा खानावळ
महाविकास आघाडीचे जागा वाटपावरही प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टिका केली आहे. ही जागा वाटप म्हणजे मराठा खानावळ असे ते म्हणाले. मुस्लिमांमध्ये जेवताना बिस्मिल्ला केला जातो. त्यावेळी जेवढं घेता येईल तेवढं त्यात घेतलं जातं. तसेच महाविकास आघाडीत सुरू आहे. जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा मिळतील याकडे या तिन्ही पक्षांचे सुरू असल्याचे ते म्हणाले. ताटातलं किती ओढता येईल तेवढं ओढण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे असंही ते म्हणाले.