जाहिरात

बहिण भावाच्या लढतीनंतर आता पाचोऱ्यात नणंद भावजय लढत! राजकीय वैरामुळे नेत्यांचा ताप वाढला

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनी महायुती न करण्याचा निर्णय घेत स्वबळाची घोषणा केलेली आहे.

बहिण भावाच्या लढतीनंतर आता पाचोऱ्यात नणंद भावजय लढत! राजकीय वैरामुळे नेत्यांचा ताप वाढला
जळगाव:

मंगेश जोशी 

Pachora Municipality Election: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिकेची निवडणूक केवळ राजकीय संघर्षाची नव्हे तर नात्यांची कसोटी ठरवणारी होण्याची शक्यता आहे. पाचोरा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाऊ-बहीण असा सामना झाल्यानंतर आता नगरपालिका निवडणुकीत ननंद भावजय अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे ही लढत महायुतीतील मित्रपक्षांमध्येच होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष हे पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकांकडे लागले आहे. राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र अद्यापही महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यातील युती - आघाडी बाबत समन्वय झालेला नाही. तरी राज्यात सर्वात प्रथम पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनी महायुती न करण्याचा निर्णय घेत स्वबळाची घोषणा केलेली आहे. 

विधानसभा निवडणुकीत किशोर पाटील यांच्या विरोधात  त्यांची बहिण व शिवसेनेचे दिवंगत आमदार आर ओ पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी आपल्या भावासोबत आवाहन उभे केले होते. तर दुसरीकडे महायुती असूनही भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांना भाजपच्या नेत्यांनी पाठबळ दिल्याचा आरोप किशोर पाटलांनी केला होता. याच मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह प्रताप हरी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे विधानसभेच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे चारही बाजूने घेरले गेले होते.  मात्र आपल्या विकासाच्या अजेंडावर किशोर पाटलांनी ठाम राहत त्या सर्वांचा पराभव करून विधानसभेत पाचोरा भडगाव मतदार संघात भगवा फडकवला होता. 

नक्की वाचा - Sharad Pawar: शरद पवारांची शिंदे, अजित पवारांसोबत युतीची तयारी? पक्षाच्या बैठकीत नक्की काय ठरलं?

पण विधानसभा निवडणुकीला वर्ष होत नाही तोच आपल्या विरोधात लढणारी आपली बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे बंडखोर अमोल शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप वाघ यांच्यासह प्रताप हरी पाटील यांना भाजपने पक्षात घेऊन आमदार किशोर पाटलां विरोधात नवी रणनीती आखायला सुरवात केली आहे. हीच गोष्ट किशोर पाटलांच्या जिव्हारी लागल्याने पक्षश्रेष्ठींच्या परवानगी शिवाय किशोर पाटलांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आमदार किशोर पाटलांनी एकला चलो रे ची भूमिका घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांनीही पाचोरा भडगाव मतदार संघात भाजप स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत पाचोरा आणि भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये रंगणार आहे.

नक्की वाचा - Bihar Election: निवडणूक बिहारमध्ये, नोटीस महाराष्ट्रातून! राजद उमेदवाराच्या अडचणी वाढणार? प्रकरण काय?

पाचोरा  नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे महिला राखीव आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र भाजपने अजून आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार  जाहीर केला नाही. तरी वैशाली सूर्यवंशी या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी ही लढत होण्याची शक्यता असली तरी नणंद विरुद्ध भाऊजय अशी लढत या निवडणुकीत होण्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर ओ तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जातात. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिल्याने वडिलांचा वारसा हा जोपासण्यासाठी आर ओ तात्या पाटील यांची मुलगी व किशोर पाटलांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला.  विधानसभा निवडणुकीत भावासमोर आवाहन उभे केले होते. 

नक्की वाचा - Rahul Gandhi Hydrogen Bomb : सीमा, सरस्वती की रश्मी? लोकसभेत 22 वेळा केलं बोगस मतदान? 'ती' हिरोईन आहे तरी कोण?

किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरल्यास विकास, कामांचा दावा व संघटनात्मक ताकद ही सुनीता पाटील यांच्या मागे राहणार आहे. तर दुसरीकडे भाजपकडे राज्यातील सत्ता आणि नव्या पक्षातील नेत्यांचा आधार हा वैशाली सूर्यवंशी यांच्यासाठी भक्कम ठरण्याची शक्यता आहे. पाचोरा मतदारसंघात निवडणुकीत जाहीर होण्यापूर्वीच भाजप व शिवसेनेमधील संघर्ष वाढला आहे. सोबतच नगरपरिषदेच्या निवडणुकीत नात्यांचाही संघर्ष होणार असल्याने दोन्ही पक्षातील नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. आमदार किशोर पाटील हे नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नी सुनीता पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे किशोर पाटलांची कट्टर राजकीय वैरी असलेली बहीण वैशाली सूर्यवंशी यांना भाजप रिंगणात उतरवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण भाजप उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com