PM Modi on NDTV : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा एनडीटीव्ही ग्रुपला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मतांचा राजकारणाचा मी विचार करत नाही आणि तसं राजकारणही करत नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
मतांच्या राजकारणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे की राजकीय पक्षांच्या डोक्यात निवडणुका जिंकण्यासाठी काही ना काही खेळ सुरु असतात. माझ्या डोक्यात या गोष्टी येत नाहीत. मी पुन्हा सरकार यावं यासाठी सरकार चालवत नाही. मी देश घडवण्यासाठी सरकार चालवतो. सरकार देश घडवेल, सरकार देशाचं भविष्य बदलेल, देशाच्या भावी पीढीचं भविष्य बदलेल हा विचार माझ्या डोक्यात असतो. व्होट बँकेच्या हिशेबाने मी विचार करत नाही आणि तसं राजकारणही करत नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
हिंदू-मुस्लीम मतांचं राजकारण करत नाही- PM मोदी
देशाच्या विकासात समाजातील शेवटच्या घटकाला सामावून घेतले पाहिजे. फक्त हिंदूंकडे लक्ष द्या, मुस्लिमांकडे दुर्लक्ष करा. किंवा मुस्लिमांकडे लक्ष द्या, हिंदूकडे दुर्लक्ष करा, ही माझी काम करण्याची पद्धत नाही. समाजाच्या तळागळातील प्रत्येकाला सक्षम केलं पाहिजे, त्या सर्वांना ताकद दिली पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
भाजपच्या यशाचं रहस्य काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या विजयाच्या यशाचं रहस्य सांगताना म्हटलं की, भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात, सर्व समाजांमध्ये, गाव असो की शहर सगळीकडे आपलं स्थान निर्माण केलं आहे. भाजपचं हे यश मोठ्या तपस्येचं फळ आहे आणि संघटनेची ताकद आहे. 30 मतदारांवर भाजपचा एक कार्यकर्ता काम करतो, ही भाजपची ताकद आहे.
(नक्की वाचा- Exclusive: BJP ला किती जागा मिळतील? जगप्रसिद्ध निवडणूक विश्लेषक इयान ब्रेमर यांनी वर्तवले भाकीत)
एनडीटीव्ही ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. प्रत्येक टप्प्यावर भाजपचा नेता आहे, अशी भावना लोकांची आहे. महिलांचा सक्रिय सहभाग वाढत आहे. महिलांचा सहभाग प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. आम्ही लखपती दीदी कार्यक्रम सुरू केला. 3 कोटी महिलांना लखपती बनवणे याचा अर्थ महिला अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करतील.
विरोधी पक्षाला शत्रू मानत नाही- PM मोदी
विरोधी पक्षाला मी शत्रू मानत नाही. मी कुणालाही कमी समजत नाही. विरोधी पक्षाकडेही अनुभव आहे. त्यांनी देखील 60-70 वर्ष सरकार चालवलं आहे. त्यांनी जी चांगली कामे केली, त्यातून मी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यांना मीडियामध्ये जे बोलायचं आहे ते बोलू द्या. पण देशच्या हितासाठी काही सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. देश कुणाची खासगी मालमत्ता नाही. देशातील 140 कोटी जनतेला देशाला पुढे नेण्याचा अधिकार आहे. ते देखील मला काही सूचना करु शकतात. कारण माझं लक्ष विकास करणे हे आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- ओबीसींचा दर्जा रद्द झाल्याने ममता बॅनर्जींच्या मुस्लीम राजकारणाला कसा पोहोचेल धक्का?)
मी जीवनात अनेक अडथळ्यातून, कठीण काळातून पुढे आलो आहे. सुख-सुविधांशी माझा कोणताही संबंध राहिलेला नाही. नवनवीन गोष्टी शिकण्याची माझी इच्छा असते. काम संपल्यानंतर माझा थकवा कमी होतो. काम केलं नाही तर मला थकवा जाणवतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world