मुंबई हे शहर फक्त स्वप्न पाहात नाही तर ते स्वप्न जगणारं शहर आहे. काही करण्याचा संकल्प घेऊन चालणाऱ्या लोकांना मुंबईनं कधी निराश केलं नाही. या ड्रिम सिटीमध्ये मी तुमच्यासमोर 2047 चं ड्रिम घेऊन आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून विकसित भारत बनवायचा आहे. त्यामध्ये मुंबईची मोठी भूमिका आहे, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिलंय. त्याचबरोबर इतकं मतपरिवर्तन झालेला पक्ष देशात कोणताही नाही असा टोला त्यांनी 'उबाठा' पक्षाला लगावला.
शिवाजी पार्कवर महायुतीची प्रचारसभा झाली. त्या सभेत पंतप्रधान बोलत होते. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
( नक्की वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत पंतप्रधानांचं विरोधकांना आव्हान, म्हणाले...)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे
भारताबरोबर स्वतंत्र झालेले देश आपल्यापुढं निघून गेले. आपण त्यांच्यापेक्षा कमी होतो का? त्या सरकारमध्ये कमतरता होती. त्यांनी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. लाल किल्ल्यावरुन देशाला आळशी असं संबोधन करणारे पंतप्रधान होते. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्ल्यानुसार काँग्रेसला विसर्जित केलं असतं तर आज भारत किमान पाच दशकं पुढं असता. स्वातंत्र्यानंतर देशाताील प्रत्येक गोष्टीचं काँग्रेसीकरण झालं. त्यामुळे देशाचं किमान पाच दशकं नुकसान झालं.
स्वातंत्र्यानंतर भारत सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. 2014 साली काँग्रेसनं आम्हाला सत्ता सोपवली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावरुन अकराव्या क्रमांकावर गेली होती. गेल्या दहा वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगाताील पाचव्या क्रमांकावर पोहोचली होती. काही काळामध्येच आपण देशातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, ही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला विकसित भारत देईन, असं आश्वासन मोदींनी या सभेत दिलं.
( नक्की वाचा : उद्धव ठाकरे म्हणतात, "नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत" )
निराशेच्या गर्तेत बुडालेल्या लोकांना प्रत्येक गोष्ट अशक्य वाटते. या लोकांना राम मंदिर देखील अशक्य वाटत होतं. भारतामध्ये राहाणाऱ्या लोकांचा निर्धार इतका पक्का होता की त्यांनी एका स्वप्नांसाठी 500 वर्ष लढा दिला. हा छोटा इतिहास नाही. अनेक पिढ्यांचा संघर्ष, लाखोंचं बलिदान आणि 500 वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नांमुळे रामलला आज भव्य मंदिरात विराजमान आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : महाराष्ट्राला नरेंद्र मोदींकडून 7 अपेक्षा, राज ठाकरेंनी त्यांच्यासमोरच बोलून दाखवल्या )
या निराशेच्या गर्तेतील लोकांना कलम 370 हटवणे अशक्य वाटत होते. आज मी तुमच्यासमोर कलम 370 ची भिंत कब्रस्तानात गाडली आहे. पुन्हा 370 कलम लागू करण्याचं स्वप्न काही जणं पाहात आहेत, पण जगातील कोणतीही शक्ती 370 कलम पुन्हा आणू शकत नाही.
आपल्या देशात बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले होत होते. मुंबईसारख्या शहरांनी याचा अनुभव घेतलाय. गेल्या 10 वर्षात हे सर्व प्रकार बंद झाले आहेत. देशातील संसदेनं ट्रिपल तलाकलाच तलाक-तलाक-तलाक दिला. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळण्याची 40 वर्ष लोकांनी वाट पाहिली. आज संविधानाला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या लोकांनी महिला आरक्षणाचे विधेयक पार्लमेंटमध्ये फाडून टाकले. या सर्वांच्या छातीवर बसून आरक्षण झालं.
काँग्रेस 60 वर्षांपासून गरिबी हटावचा नारा देत होते. लाल किल्ल्यावरील काँग्रेसच्या भाषणात किंवा निवडणूक प्रचारातील या नेत्यांच्या भाषणात गरीब गरीब हाच जप सुरु होता. गेल्या दहा वर्षात 25 कोटी गरिबीच्या बाहेर आले आहेत. हे अशक्य वाटणारं आम्ही खरं केलं आहे. ही सर्व मोदींची नाही तर तुमच्या मतांचं सामर्थ्य आहे. त्यामुळे ज्यांना मुलांचं उज्ज्वल भविष्य, शांतात आणि सुरक्षा, विकासाच्या असंख्य संधी हव्या आहेत, त्या सर्वांनी घराबाहेर येऊन मतदान करावं.
( नक्की वाचा : तेव्हा ही अक्कल का आली नाही ? करकरेंच्या मृत्यूवरून प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला राज ठाकरेंचा सवाल )
मुंबईकरांनी यावेळी रेकॉर्डतोड मतदान करावं. मतदान करण्यासाठी बाहेर पडताना यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाची आठवण ठेवा. या लोकांनी जनादेश चोरुन सरकार बनवलं. त्या कार्यकाळात मुंबईतील सर्व मोठे प्रकल्प त्यांनी अडवले. आम्ही मुंबईकरांना त्यांचा हक्क देणार आहोत. देशातली पहिली बुलेट ट्रेन मुंबईला मिळेल तो दिवस दूर नाही.
गेल्या 10 वर्षात भारतामध्ये सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप झाले. यामधील 8 हजारांपेक्षा जास्त स्टार्टअप मुंबईत बनली. आपण एकेकाळी मोबाईल फोनची आयात करत होतो. आज मोबाईल फोन निर्यात करत आहोत. येत्या 5 वर्षात तरुणांना असंख्य संधी मिळणार आहेत. याचा मोठा फायदा मुंबईतील तरुणांना आणि येथील व्यावसायिकांना मिळणार आहे.
आमचे सरकार मातृभाषेला मोठं महत्त्व देत आहे. नव्या शैक्षणिक धोरणांनुसार इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण मराठीमध्ये मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयातूनही मराठीतून निकालाची कॉपी मिळणं शक्य झालं, आहे. सर्वांचं जगणं सुसह्य करण्यास सरकारचं स्वप्न आहे. प्रत्येकाला पक्क घरं मिळावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. स्वस्त आणि उत्तम आरोग्य हे आमचं प्राधान्य आहे. आज प्रत्येक घरात ज्येष्ठ नागरिक आहेत. देशातील 70 वर्षांपूढील प्रत्येक व्यक्तीच्या आजारपणाची जबाबदारी त्यांच्या मुलांची नसेल तर सरकारची असेल, असं आश्वासन मोदींनी दिलं.
दहा वर्षांपूर्वी सामान्य आणि गरीब लोकांसाठी बँकेचं कर्ज हे स्वप्न होतं. आज विना गॅरंटी लोन मिळतंय. ज्यांना कुणी विचारत नव्हतं, त्यांना मोदी सरकार प्राधान्य देतं. आमच्याकडं 10 वर्षांचा रिपोर्टकार्ड आहे. तसंच 25 वर्षांचा रोडमॅप आहे. विरोधकांकडं काय आहे? त्यांचे जितके पक्ष तितके पंतप्रधान आहे. विरोधकांची नजर आपल्या मंदिरातील सोन्यावर आहे. महिलांच्या मंगळसुत्रावर आहे. ही यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.
मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्यांबरोबर हे लोक सत्तेसाठी निघून गेले. जी काँग्रेस दिवसरात्र वीर सावरकरांना शिव्या देते, आज त्यांच्या मांडीवर बसले आहेत. मी एनसीपीच्या नेत्यांना आव्हान देतो की, मी आयुष्यभर स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं राहुल गांधींकडून वदवून घ्या. ते असं नाही करणार. आता निवडणुका आहेत म्हणून ते गप्प आहे. त्यांच्या तोंडाला सध्या कुलूप लागलं आहे. पण एकदा तरी त्यांच्याकडून असं वदवून घ्या. ते असं नाही करणार, कारण त्यांना माहीत आहे की निवडणूक संपल्यावर पुन्हा ते सावरकरांना शिव्या द्यायला सुरुवात करणार आहेत
शिवसेनेची ओळख ही घुसखोरांच्या विरोधात उभी राहणारी संघटना अशी होती. आज नकली शिवसेना CAA ला विरोध करत आहे. आपल्या देशात नकली सेनेइतकं मतपरिवर्तन कोणत्याही पक्षाचं झालेलं नाही. ज्या कसाबनं मुंबईवर हल्ला केला, त्यांना ही लोकं क्लिन चीट देत आहेत. पाकिस्तानची जगात कुणीही ऐकत नाही. हे आघाडीचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. बाबासाहेब आंबेडकर धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या विरोधात होते. संविधान सभेचं यावर एकमत होतं. या मंडळींना दलित, आदिवासी, ओबीसी यांचं आरक्षण हिसकावून घ्यायचं आहे.
यंदाची निवडणुकीचे निकाल सर्व रेकॉर्ड तोडणारे असतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.