सागर जोशी, प्रतिनिधी
PMC Election 2026 : पुणे महानगरपालिकेची निवडणूक सध्या चांगलीच रंगतदार बनली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकलेल्या पेचात सत्ताधारी भाजपा चांगलीच अडकल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाच्या मिशन 100 ला आता अजित पवारांच्या राजकीय खेळीमुळे सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या बड्या नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवारांचे तगडे आव्हान
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर लढणाऱ्या भाजसमोर अजित पवारांनी मोठे आव्हान उभे केले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याचे काही खासगी सर्वेक्षणातून समोर आले आहे.
अजित पवार यांनी शरद पवार गटासोबत जुळवून घेत भाजपमधील काही बंडखोरांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारीही बहाल केली. यामुळे अनेक प्रभागांमध्ये भाजपची पारंपरिक मते विभागली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून त्यांना आता आपली रणनीती बदलण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
( नक्की वाचा : PCMC Election: नसबंदीच्या आरोपांनी राजकारण पेटले; अजित पवारांना उत्तर देताना लांडगेंनी काढले बारामतीचे कुत्रे )
कात्रजच्या सभेतून इशारा आणि बंद दाराआड चर्चा
अजित पवार यांनी भाजपला थेट अंगावर घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याला उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कात्रजच्या सभेत अजित पवारांचे नाव न घेता सूचक इशारा दिला. मात्र सभेपेक्षा जास्त चर्चा ही सभा आटोपल्यानंतर विमानतळावर झालेल्या गुप्त बैठकीची सुरू आहे.
विमानतळाकडे जाताना फडणवीसांसोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील होते. या तिन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत फडणवीसांनी पुण्यातील 165 जागांचा सविस्तर आढावा घेतला आणि कमकुवत जागांवर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
फडणवीसांनी घेतली भाजपा नेत्यांची शाळा
पुण्यातील सर्वेक्षणात भाजपसाठी नकारात्मक चित्र दिसत असल्याने फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या ठिकाणी भाजप कमकुवत ठरत आहे, तिथे तातडीने व्यूहरचना बदलण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत फडणवीसांनी पुण्यातील बड्या भाजप नेत्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केल्याचे समजते.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याचा कारभारी कोण? 165 जागा, 1165 उमेदवार; वाचा प्रत्येक वॉर्डातील हायव्होल्टेज लढती! )
अजित पवारांच्या खेळीला रोखण्यात स्थानिक नेते कमी पडत असल्याची भावना वरिष्ठ स्तरावर निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्याच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world