- आंदेकर आणि कोमकर टोळींच्या संघर्षामुळे पुणे महापालिकेची निवडणूक राजकीय वादात रूपांतरित झाली आहे
- बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर खुनाचा कट रचण्याच्या गंभीर आरोपांमुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदेकर कुटुंबातील सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे
रेवती हिंगवे
आंदेकर टोळी आणि कोमकर टोळी यांच्यातलं टोळी युद्ध पुणेकरांसाठी नवीन नाही. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याचे कुटुंबीय सध्या जेलची हवा खात आहेत. पण त्यातच त्याने आता पुणे महापालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याला एका सत्ताधारी पक्षाने उमेदवारी देण्याचे संकेत ही दिले आहेत. त्यामुळे सर्वांच्यात भूवया उंचावल्या आहेत. अशात कोमकर टोळीने ही डोकं वर काढलं आहे. जर आंदेकर यांनी उमेदवारी दिली गेली तर आपण आत्महत्या करू अशी धमकीच आयुष कोमकरच्या आईने दिली आहे. पण ही धमकी देण्याच्या दुसऱ्याच क्षणाला त्यांनी ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टोळी युद्धानंतर हे निवडणुकीच्या रिंगणार आंदेकर कोमकर यांची लढाई दिसण्याची शक्यता आहे.
पुण्यातला बंडू आंदेकर तुरुंगात आहे. त्याच्यासह त्याच्या नातेवाईक सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरही गजाआड आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात गणेश कोमकर तुरुंगात आहे. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरनं गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा पाच सप्टेंबरला पुण्यातल्या नाना पेठेत गोळ्या घालून खून केला. हा खून आणि खुनाचा कट रचणं या आरोपांखाली बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरांना अटक झाली आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरांना लढायची आहे. तशी तयारी ही त्यांनी केली आहे.
त्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टानं आंदेकरांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. तुरुंगात असलेल्या आणि खुनाचा कट रचलेल्या आंदेकरांना तिकीट कोण देणार, असा प्रश्न होता. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोनाली आणि लक्ष्मी आंदेलकरला तिकीट मिळेल, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनीच तसे संकेत दिले आहेत. आंदेकरांच्या दोन महिलांचा या खूनात काहीही रोल नाही. कट रचला एवढाच त्यांचा रोल आहे. कोर्टानं पोलिसांना सांगितलं आहे अपराधी लोकांना गोवू नका असं जगताप यांचं म्हणणं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदेकरांना क्लीन चिटच देऊन टाकली आहे. त्यामुळे सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला तिकीट मिळेल, असं दिसतंय.
पण खरा ट्वीस्ट पुढे आला आहे. आंदेकर निवडणूक रिंगणात उतरणार इथपर्यंत ठिक होतं. पण त्याच वेळी त्यांना राष्ट्रवादी तिकीट देणार आहे हे समोर येतात आयुष कोमकरची आई आक्रमक झाली आहे. तिने आंदेकर कुटुंबीयांना तिकीट दिलं तर आत्महदन करेन, असा इशारा दिला आहे. ती ऐवढ्यावरच थांबली नाही. तिनेही आंदेकरांना निवडणूक रिंगणात टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकर हिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी तिने मुलाखत ही दिली आहे. प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ आणि नारायण पेठ मधून कल्याणी कोमकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. 19 तारखेला शिवसेना भवन येथे जाऊन कल्याणी हिने मुलाखत दिली आहे. यावेळी नीलम गोऱ्हे, रवींद्र धंगेकर यांनी कल्याणी हिची मुलाखत घेतली.
आंदेकर कुटुंबीयांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महापालिकेत निवडणूक लढवली होती. वत्सला आंदेकर या 1998 मध्ये पुण्याच्या महापौर होत्या. त्यानंतर राजश्री आंदेकर, उदयकांत आंदेकर, वनराज आंदेकर हे पुण्यात नगरसेवक राहिले आहेत. पुण्यात आंदेकर टोळीची दहशत आजही आहे.पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतही वनराज आंदेकर नगरसेवक होता. सध्या नातवाच्या खुनाप्रकरणी गुंड बंडू आंदेकर तुरुंगात आहे. याआधीही आंदेकर कुटुंबातल्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूका लढवल्या. मात्र यावेळी गंभीर आरोपामध्ये आंदेकर कुटुंब गजाआड आहे. तरीही निवडणूक लढायचीच, हे आंदेकरांचं ठरलं आहे. त्यांना तिकीट द्यायचंच, असंही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलेलं दिसतंय. त्यामुळे यंदाही तुरुंगात असलेल्या आंदेकरांच्या पाठीशी पुणेकर उभे राहणार का, याची उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world