जाहिरात
This Article is From May 02, 2024

शिंदेकडे गेलेला नगरसेवक काही तासात ठाकरेंकडे परतला, नक्की काय झालं?

शिंदेकडे गेलेला नगरसेवक काही तासात ठाकरेंकडे परतला, नक्की काय झालं?
कल्याण:

कल्याण लोकसभेत काही नाट्यमय घडामोडी घडत आहे. आदित्य ठाकरे कल्याणच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कल्याणमध्ये आले होते. त्यानंतर काही तासातच ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यात केडीएमसीचे माजी नगरेसवक पुरुषोत्तम चव्हाण यांचाही समावेश होता. पण या प्रवेशाला काही तास होत नाही तोच चव्हाण यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे एकीकडे या घटनेने खळबळ उडाली तर दुसरीकडे शिंदे गटाला ठाकरेंनी धक्का दिला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'कामासाठी गेलो होतो, प्रवेश करून घेतला'  

माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. पण या प्रवेशाला काही तास होत नाही तोच चव्हाण यांनी पुढे येत मोठा खुलासा केला आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तीत कामासाठी गेली होता. त्यावेळी माझा बळजबरीने प्रवेश करुन घेतला. यांच्या या वक्तव्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिवाय शिंदे गटाच्या आनंदावरही त्यांनी काही तासातच पाणी फेरले आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनेवर एकच हल्ला चढवला आहे. 

हेही वाचा - पक्षविरोधी कारवायांमुळे शिवानी वडेट्टीवारांना नोटीस? अखेर पक्षाकडून स्पष्टीकरण

'सावधान राहा! कार्यकर्ते चोरणारी टोळी'

दरम्यान चव्हाण यांनी काही तासात घर वापसी केली. त्यांचा पक्ष प्रवेश कल्याण पुर्वेच्या वालधुनी इथल्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी मुलं चोरणारी टोळी सक्रीय असते. पण आता कल्याण डोंबिवलीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी चोरणारी टोळीही सक्रीय झालीय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सावध रहावं असे सांगत, शिंदे गटाला टोला लगावला.  
  
'हिंमत असेल तर फाईट करा' 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय साळवी यांनी यानिमित्ताने शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाची बातमी ऐकली. हे पाहून धक्का बसला. मात्र त्यानंतर चव्हाण येऊन भेटले. त्यांच्या बरोबर काय घडले हे त्यांनी सांगितले. जबरदस्तीने पक्ष प्रवेश करून घेतला. ही बाब शिंदे कंपनीला लज्ज्यास्पद असल्याचे साळवी म्हणाले. हिंमत असेल तर फाईट करा, जे काही असेल ते होऊन जाऊ दे, असं आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com