जाहिरात

BMC Election 2026: मुंबईत किती ठिकाणी होणार ठाकरेंची सेना आणि शिंदेच्या शिवसेनेत मुकाबला?

BMC Election 2026: मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड असून, या 227 जागांपैकी शिवसेना UBT आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये 97 ठिकाणी थेट लढत होणार आहे.

BMC Election 2026: मुंबईत किती ठिकाणी होणार ठाकरेंची सेना आणि शिंदेच्या शिवसेनेत मुकाबला?
मुंबई:

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये (BMC Election 2026)  उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन सेनांमध्ये मतांसाठीची लढाई पाहायला मिळणार आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Shivsena UBT Chief Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS Chief Raj Thackeray) ही देखील असून ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Eknath Shinde Shivsena) यांच्यात मुंबईमध्ये 87 वॉर्डमध्ये ठिकाणी थेट लढत होणार आहे.   

नक्की वाचा: संभाजीनगर महापालिका कोण जिंकेल? 'असं' आहे राजकीय चित्र

भाजप आणि ठाकरेंची शिवसेना किती मतदारसंघात आमनेस-सामने येणार?

मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2026)  शिवसेना UBT आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 69 जागांवर थेट लढत होईल. तर 18 जागांवर मनसे आणि शिंदे सेना एकमेकांसमोर उभे ठाकतील. अशा प्रकारे एकूण 87 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पाहायला मिळेल. मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड असून, या 227 जागांपैकी शिवसेना UBT आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये 97 ठिकाणी थेट लढत होणार आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढवत आहे. मुंबईमध्ये शिवसेना (उबाठा) 163, मनसे 53, भाजप 137 आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवत आहे.

नक्की वाचा: KDMC Election कल्याण-डोंबिवली महायुतीतील बंडखोर अन् पक्षविरोधी कार्यकर्ते कोण? 55 ते 60 जणांची यादीच आली समोर

'या' मराठीबहुल भागांत दोन्ही शिवसेना भिडणार

  1. शिवडी
  2. वरळी
  3. दादर-माहीम
  4. वडाळा
  5. भांडूप
  6. विक्रोळी
  7. घाटकोपर(पूर्व)
  8. मागाठाणे
  9. दिंडोशी
  10. दहीसर
  11. वांद्रे(पूर्व)
  12. कलिना 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनांमध्ये 13 मतदारसंघांत थेट लढत झाली होती. यापैकी ठाकरे गटाने 7, तर शिंदे गटाने 6 जागा जिंकल्या होत्या. या आकडेवारीनुसार मुंबईत ठाकरे गटाचे पारडे जड राहिले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत 87 जागांवर दोन्ही सेना एकमेकांसमोर ठाकल्या आहेत. वरळी, दादर-माहीम, शिवडी आणि भांडुप यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये होणारा संघर्ष हा निर्णायक ठरेल. मुंबईत 'मराठी माणूस' हा नेहमीच निर्णायक फॅक्टर  राहिला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला आहे. सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठाकरेंचे मराठी प्रेम हे बेगडी असल्याचे म्हणत आरोप करण्यास सुरूवात केली आहे.  मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणातील रंजक निवडणूक ठरणार असून ही ठाकरे बंधूंच्या प्रभावाची आणि त्यांच्या भविष्यातील राजकारणासाठीची  लिटमस टेस्ट असणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com