महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित घटना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडली. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. एका विशेष मुलाखतीत दोन्ही नेत्यांनी पहिल्यांदाच या निर्णयामागची पार्श्वभूमी आणि महाराष्ट्रासमोरील संकटावर भाष्य केले. ही केवळ दोन भावांची भेट नसून मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली.
20 वर्षांची प्रतीक्षा आणि एकत्र येण्याचे कारण
"20 वर्षे वाट का पाहावी लागली?" या प्रश्नावर राज ठाकरे अत्यंत स्पष्टपणे बोलले. ते म्हणाले, "काही गोष्टी का घडल्या आणि कशा घडल्या, हे आता सोडून दिले पाहिजे. कुठल्याही वादापेक्षा किंवा वैयक्तिक भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे आणि ते मराठी माणसाला समजले आहे. आज प्रश्न आमच्या राजकीय अस्तित्वाचा नाही, तर महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आहे."
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
...तर महाराष्ट्र आम्हाला कधीच माफ करणार नाही
राज ठाकरे यांनी पुढे नमूद केले की, सध्या मुंबई, ठाणे आणि MMR (मुंबई महानगर प्रदेश) अशा वळणावर उभे आहेत जिथे परिस्थिती 'अभी नही तो कभी नही' अशी झाली आहे. जर आज आम्ही एकत्र येऊन या संकटाचा सामना केला नाही, तर येणारा काळ आणि महाराष्ट्र आम्हाला कधीच माफ करणार नाही.
'स्वतंत्र चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे पोळी भाजतील'
उद्धव ठाकरे यांनी या युतीकडे भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीकोनातून पाहिले. ते म्हणाले, "दोन भाऊ एकत्र येणे हा मुद्दा भावनिक वाटत असला तरी, ते महाराष्ट्राच्या एकतेचे प्रतीक आहे. आपण मराठी आहोत आणि हा महाराष्ट्र आपला आहे. जर आपण आपल्या वेगळ्या चुली मांडत बसलो, तर जे लोक महाराष्ट्र तोडण्याची स्वप्ने पाहत आहेत, ते आपली पोळी भाजून घेतील. त्यामुळेच महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे."
(नक्की वाचा- Akola News: अकोला हादरले! काँग्रेसच्या बड्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या)
मुंबई आणि मराठी माणसापुढील धोके
राज ठाकरे यांनी मुंबईवरील वाढत्या दबावाबद्दल भीती वर्तवली. त्यांच्या मते, दररोज उत्तरेतून ट्रेन भरून माणसे महाराष्ट्रात येत आहेत. ठाणे जिल्ह्याचे उदाहरण देताना त्यांनी म्हटलं की, हा जगातील असा एकमेव जिल्हा आहे जिथे 8-9 महानगरपालिका आहेत. हे बाहेरून येणाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणाचे लक्षण आहे.
मुंबई वेगळी करण्याचा कट
बाहेरून येणारी माणसे केवळ येत नाहीत, तर ते स्वतःचे स्वतंत्र मतदारसंघ तयार करत आहेत. केंद्रात आणि राज्यात असे लोक सत्तेत आहेत ज्यांची इच्छा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचे वातावरण आज पुन्हा निर्माण झाले आहे. जर महापालिकेतही हेच लोक आले, तर मराठी माणूस हतबल होईल. हे सर्व आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे राज ठाकरेंनी ठामपणे सांगितले.