पुण्यात राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात, अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक

अजित पवारांशी माझे मतभेद असतील, मात्र अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मला तरी आजपर्यंत आठवत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

जाहिरात
Read Time: 3 mins

Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं, असा आरोप राज यांनी केला.  शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांचं मात्र राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.  राज ठाकरे यांनी आज भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारसभा घेतली, तिथे ते बोलत होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 साली स्थापना केली.  त्यानंतर जातीपातीचं विष महाराष्ट्रात कालवलं गेलं. तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्ही राजकारण करावं, हा यामागचा हेतू होता. अजित पवारांशी माझे मतभेद असतील, मात्र अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मला तरी आजपर्यंत आठवत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

( नक्की वाचा : माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार? )

राज ठाकरे यांनी पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. पुण्याची आज लोकसंख्या 70 लाख आहे, तर वाहने 72 लाख आहे. पुण्यात मागील 10 वर्षात पुण्यात बाहेरुन 30 लाख लोक आले आहे. मुंबई शहराची वाट लागायला एक काळ लागला. मात्र पुणे शहर जसं वाढतंय त्याची वाट लागायला वेळ लागणार नाही, अशी चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

या शहरांचं नियोजन आज झालं नाही तर ही शहरं फुटतील. उद्धवस्त होतील. या शहराकडं नीट लक्ष जाऊ नये म्हणून अनेक नेतं तुम्हाला जातीपातीमध्ये गुंतवणून ठेवतायत. या जाती-पातीमधून बाहेर या. त्यामधून तुमच्या हाती काहीही लागणार नाही, असं आवाहन राज यांनी केलं. पुणं पूर्वी टुमदार शहरं होतं. आज या पुण्याची अवस्था काय झालीय? असं राज यावेळी म्हणाले.

Advertisement

( नक्की वाचा : 17 नंबरच्या फॉर्मवरुन धुमाकूळ, निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्रस्त, पुण्यात नेमकं घडलं तरी काय? )
 

मुंबई शहराची वाट वाहायला वेळ लागला. पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे झाला आणि हे शहर वेडवाकडं पसरलं. याचं नियोजन नाही. पुणे शहराची लोकसंख्या 70 लाख आहे. 5-10 वर्षांपूर्वीपर्यंत ही लोकसंख्या 35 लाख होती. 70 लाख लोकसंख्येच्या शहरात 72 लाख वाहनं आहेत. रस्ते कुठून मिळणार? असा सवाल राज यांनी विचारला.

मुस्लीम समाजासाठी काँग्रेसला मतदान करा. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा असे फतवे काढले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मौलवींचे फतवे कशाला?  मशिदीमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर राज ठाकरे आज फतवा काढतो की मुरलीधर मोहोळ तसंच भाजपाचे, अजित पवारांचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करा, असं राज यांनी सांगितलं. 

Advertisement

या देशात राम मंदिर होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राम मंदिर देशात नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं. अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानंतर त्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. या गोष्टी आपल्या ऱ्हदयात ठेवा. मतपेटीतून व्यक्त करा, असं आवाहन त्यांनी केलं.