निवडणूक प्रचारात मतदारांना आपली आजवरची काम आणि भविष्यातील योजना सांगण्याबरोबरच निवडणूक चिन्हांची आठवणही सर्व राजकीय पक्ष तसंच अपक्ष उमेदवारही करत असतात. पक्षाचे धोरण किंवा नेत्यांच्या करिश्माच्या आधारावर निवडणुका लढवल्या जात असल्या तरी मतदार त्यांचा कौल हे चिन्हासमोरील योग्य ते बटण दाबून व्यक्त करतात. त्यामुळेच शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही गट धनुष्यबाण या पारंपारिक चिन्हासाठी आग्रही होते. या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झालीय. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता मशाल चिन्हावर आगामी लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे.
वाघाच्या डरकाळीपासून सुरुवात.
बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानंतर 1966 साली शिवसेना या संघटनेची स्थापना केली. स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या या पक्षाचा सुरुवातीचा फोकस राजकारण नव्हता. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण हे बाळासाहेबांचं धोरण होतं. 1970 च्या दशकात भूमिपूत्रांना नोकरी मिळवून देण्यासाठी शिवसेनेनं मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनामुळे मुंबई आणि परिसरातील मराठी माणसांमध्ये शिवसेनेची लोकप्रियता वाढली. आजही या भागात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट असल्याचं मुख्य कारण सत्तरच्या दशकात केलेल्या संघर्षात आहे.
1968 मध्ये शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता लाभली. पण तेव्हा चिन्ह ठरलं नव्हतं, सुरुवातीला डरकाळी फोडणारा वाघ याच चिन्हासाठी शिवसैनिक आग्रही होते. मात्र निवडणूक आयोगात हवं ते चिन्ह मिळत नाही. निवडणूक आयोगच ठराविक चिन्हांचा पर्याय पक्षाला देतं. त्यातून एक पर्याय निवडणं राजकीय पक्षांना बंधनकारक असतं.
धनुष्यबाणाची कल्पना कशी सुचली?
1968 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा दाखला यासाठी दिली जातो. त्या निवडणुकीतील प्रचारात हातात धनुष्यबाण धरलेली राम-लक्ष्मणाची जोडी चर्चेत होती. त्यांच्या बातम्या त्याकाळातील वृत्तपत्रातही छापून आल्या होत्या. त्यातूनच शिवसेनेला धनुष्यबाणाची कल्पना सुचली असं सांगितलं जातं. अर्थात शिवसेनेला हे चिन्ह मिळण्यासाठी तीन दशकं म्हणजे 1989 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. त्यापूर्वीच्या 6 वेगवेगळ्या चिन्हांवर लढवली होती. विशेष म्हणजे ही सर्व आता निरनिराळ्या पक्षांची चिन्हं आहे.
6 चिन्ह आणि 6 निवडणुका
1970 मध्ये शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक उगवता सूर्य या चिन्हावर जिंकले. आज हे तामिळनाडूतील डीएमके अर्थात द्रविड मुन्नेत्र कझगमचं आहे. शिवसेनेचे दिवगंत मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंनी रेल्वे इंजिनवरही निवडणूक लढलीय. हे आता राज ठाकरेंच्या मनसेचं निवडणूक चिन्ह आहे.
1984 साली शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली. तेव्हा जोशी आणि महाडिक भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. 1989 मधल्या एका निवडणुकीत शिवसेना कप-बशी चिन्हावरही लढली. जे चिन्ह गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीचं होतं.
1968 साली मुंबई महापालिकेत शिवसेना ढाल-तलवारीच्या निशाणीवर लढली. शिवसेना फुटीनंतर हे चिन्ह काही काळ शिंदे गटाला मिळालं होतं. 1985 च्या विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हं भेटली. तेव्हा शिवसेनेत असलेले छगन भुजबळ मशाल चिन्हावर लढले. ते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं आहे.
1988 आधी राजकीय पक्षांच्या चिन्हांबाबत ठोस धोरण नव्हतं. 1988 नंतर निवडणूक आयोगानं चिन्हांबाबतीत नवे नियम बनवले. त्याआधी शिवसेनेनं चिन्हासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र चिन्हासाठी आवश्यक मतांची टक्केवारी नसल्यामुळे शिवसेनेचे प्रस्ताव नाकारण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world