शरद सातपूते, प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत आग्रही होती. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रहार पाटील यांना इथं उमेदवारी मिळाली आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतरही काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांची नाराजी लपलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या गुरुवारी झालेल्या सभेत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्याला उत्तर दिलंय.
'आम्ही सांगलीचे वाघ'
आम्ही सांगलीची जागा हक्कानं मागितली होती. कुस्तीचा फड वेगळा आणि राजकीय फड वेगळा. तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचा धर्म पाळतील. महाविकास आघाडीचा अनपेक्षित निर्णय आम्ही मान्य केलाय. दिल्लीमध्ये निर्णय झाला नाही. महाराष्ट्राचा वाघ तुम्ही आता तर सांगलीचा वाघ आम्ही आहोत, असं कदम यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही लोकांनी शिवसेना फोडली. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे पाप देखील काही जणांनी केली. ही जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही भांडत होतो. पण, दुर्दैवानं मिळाली नाही. वरिष्ठ नेत्यांनी सांगलीच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रही राहण्यासाठी सांगितलं होतं. ही जागा आम्हाला मिळेल असा विश्वास होता. उद्धव ठाकरे तुम्ही देशातील, राज्यातील वाघ आहात. आम्ही देखील सांगलीचे वाघ आहोत, असं कदम यांनी या प्रचारसभेत स्पष्ट केलं.
4 जूननंतर सत्कार करु
विश्वजीत कदम यांच्या टोलेबाजीला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत करण्याचे काही जणांचे डावपेच आहेत. विशाल पाटील यांना भाजपच रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप, संजय राऊत यांनी केला. वसंतदादा पाटील हेच एकमेव सांगलीचे वाघ होते. विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही, हे चार जूनलाच कळेल, असा उत्तर राऊत यांनी दिलंय. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राऊत सांगलीमध्ये आले आहेत, त्यावेळी ते बोलत होते.
( नक्की वाचा : 3 पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार? )
कालची सभा सकारात्मक झाली, तिरंगी लढत आहे, तिरंगी लढत करण्यामागे कुणाचे डावपेच हे नंतर कळेल. एक भाजपचा अधिकृत उमेदवार , एक अनधिकृत उमेदवार आहे. भाजप नेत्यांचा फौजफाटा सांगलीमध्ये येतोय. काही नेते काकासाठी, काहीजण दादासाठी येतायत. वसंतदादा पाटील हे वाघ आम्ही पाहिले. विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. स्वतःला वाघ सिद्ध करायचे असेल तर चंद्रहार पाटील यांना विजयी केले पाहिजे. 4 जून नंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू असा टोला राऊत यांनी लगावला.
जयंत पाटील हे वाघ आहेत ते वाघ आपण जतन केले पाहिजेत, हे देखील राऊत यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबत राहुल गांधींशी बोलणे झाल्याची माहितीही त्यांनी दिली.