जाहिरात
This Article is From May 02, 2024

सांगलीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, पुढे काय तेही सांगितले

सांगलीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, पुढे काय तेही सांगितले
सांगली:

महाविकास आघाडीत सांगली लोकसभेबाबत शेवटपर्यंत ओढाताण सुरू होती. दावे प्रतिदावे केले जात होते. सांगली लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही होती. तर कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेची असे गणित शिवसेना ठाकरे गटाने मांडले होते. त्यानंतर ठाकरे गटाने उमेदवारही जाहीर केला. तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीतील या महागोंधळावर शरद पवार यांनी आता पर्यंत भाष्य केले नव्हते. मात्र पवारांनी यावर भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवाय पुढच्या काळात सांगलीत काय होईल याबाबतही वक्तव्य केले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सांगली लोकसभे बाबत काय म्हणाले पवार? 

सांगली लोकसभेबाबत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केले. महाविकास आघाडीची प्रत्येक जागेबाबत चर्चा झाली. मात्र सांगली बाबत चर्चा होण्या आधीच उमेदवार जाहीर करण्यात आला. प्रसार माध्यमातून उमेदवार जाहीर झाल्याचे समजल्याचे पवारांनी सांगितले. त्यानंतर आम्हीही कोणाला उमेदवारी दिली याची चाचपणी केली. महाविकास आघाडीतील हा एकमेव अपवाद होता. ज्या जागेवर कोणतीच चर्चा झाली नाही. थेट उमेदवार रिंगणात उतरवला गेला असे पवार यांनी थेट सांगून टाकले. 

हेही वाचा - शिंदेकडे गेलेला नगरसेवक काही तासात ठाकरेंकडे परतला, नक्की काय झालं?

सांगलीत पुढे काय होणार?

सांगली लोकसभेचा निर्णय आता झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील निवडणूक रिंगणात आहेत. होय नाही करत त्यांना आता मान्यता देण्यात आली आहे. आता झालं ते गेलं विसरून लोकांमध्ये गेले पाहीजे असे शरद पवारांनी सांगितले. शिवाय मी  ही सांगलीच्या तासगावमध्ये सभा घेणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. आता निर्णय जनतेच्या हातात आहे. जनताच काय तो निर्णय सांगलीबाबत देईल असेही ते म्हणाले. 

सांगलीत तिरंगी लढत 

सांगली लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. यात भाजपचे संजय काका पाटील, काँग्रेस बंडखोर विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत होत आहे. संजयकाका पाटील यांनी विजयाचा विश्वास आहे. पण पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसतो की काय याचीही भिती त्यांना आहे. तर काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने रिंगणात असलेल्या विशाल पाटीव पुर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे. मागिल निवडणुकीत वंचितने त्यांचे गणित बिघडवले होते. यावेळी ती कसर पुर्ण करण्याचा पण त्यांनी केला आहे. तर शेतकऱ्याचा लेक लोकसभेत जाणार म्हणून चंद्रहार पाटील तयाराला लागले आहेत.