अमजद खान, कल्याण
कल्याण लोकसभा मतदारसंघात नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे रमेश जाधव यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी यापूर्वी अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या दिवशी अखेर असे काय घडले की, उद्धव ठाकरे यांनी रमेश जाधव यांना फोन करुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. आता 6 मे रोजी छाननीच्या दिवशी खासदार शिंदे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार राहणार हे स्पष्ट होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. संपूर्ण राज्यात या निवडणुकीची चर्चा आहे. शिवसेनेच्या फूटीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांच्या समोर कोण उभे राहणार याची चर्चा सुरु होती.
निवडणुकीच्या घोषणा झाल्यावर खासदार शिंदे यांच्या समोर महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. त्यांनी प्रचार देखील सुरु केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र माजी महापौर आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
( नक्की वाचा : 3 पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार? )
रमेश जाधव यांनी याबाबत त्यांनी सांगितले की, मला उद्धव ठाकरे यांनी फोन करुन अर्ज भरण्यास सांगितले आहे. एबी फॉर्म दिलेला नाही. 6 मे रोजी एबी फॉर्मबद्दल माहिती मिळेल. वैशाली दरेकर यांनी उमेदवारी दाखल केलीय. मात्र त्यांच्या अर्जात त्रूटी असल्यास अर्ज बाद झाल्यास त्यासाठी मी अर्ज दाखल केला आहे.
मात्र वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत शंका आहे का? रमेश जाधव यांना उमेदवारी दिली जाणार हे आधीच ठरले होतं का? ही ठाकरे गटाची रणनिती होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 6 मे रोजी मिळणार आहे.
(नक्की वाचा - 'ऐनवेळी मला तिकीट नाकारलं हे माझ्यासाठी...'; भाजप खासदार राजेंद्र गावितांचं मोठं विधान)
वैशाली दरेकर यांची प्रतिक्रिया
पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्ते, पदाधिकारी काम करत असतात. पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरला असून, पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी फॉर्म भरला आहे. पक्षाची रणनीती असते त्यानुसार त्यांनी फॉर्म भरला आहे. आपल्यावर कोणताही दबाव नसून, माघार देखील घेणार नाही. 4 जूनला मशाल लोकसभेत पोहचणार आणि उमेदवार देखील मीच असणार, असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world